नवी दिल्ली : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवण्यासाठी हजारो किमी अंतर कापताना ट्रक चालकांची दमछाक होत असते. भारतासारख्या उष्ण कटीबंधीय देशातून ट्रक चालवणे म्हणजे उष्णतेच्या भट्टीत तापण्यासारखे आहे. आता ट्रक चालकांना ‘एसी’ ची थंड हवा खात ट्रक चालवता येणार आहे. येत्या २०२५ पासून देशातील ट्रक चालकांना ‘एसी’ कॅबिन सक्तीचा करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे.
महिंद्रा लॉजिस्टीकच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, जेव्हा मी मंत्री बनलो तेव्हा ४४ ते ४७ अंश तापमानात चालकांची परिस्थिती काय होत असेल याचा विचार माझ्या मनात आला. मी एसी कॅबिनचा प्रस्ताव दिला तर काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे खर्च वाढेल. आता मी अंतिम आदेशावर स्वाक्षरी केली आहे. चालकांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा गरजेची आहे. जास्तीत जास्त चालक शाळा सुरू करून चालकांची कमतरता दूर करणे गरजेचे आहे. ‘एसी’ कॅबिनमुळे चालकांना दिलासा मिळू शकेल. कारण कोणत्याही हवामानात दिवसाचे १४ ते १६ तास चालकाच्या सीटवर बसणे हे मोठे कष्टाचे काम आहे.
लॉजिस्टीक खर्च कमी करणे गरजेचे
चालक नसल्याने भारतात विद्यमान चालक १४ ते १६ तास काम करतात. तर दुसऱ्या देशांमध्ये चालकांचे कामाचे तास ठरवलेले आहेत. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यामुळे लॉजिस्टीकचे महत्व अधिक आहे. भारताला निर्यात वाढवण्यासाठी लॉजिस्टीकचा खर्च कमी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.