
इम्फाळ : मैतेई आणि कुकी यांच्यातील वांशिक संघर्षामुळे आणि राजकीय उदासीनतेमुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला. मैतेई समाजाचे नेते अरामबाई तेंगगोल यांच्या अटकेनंतर जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनी अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने केली. त्यामुळे राज्यातील पाच जिल्ह्यांमधील इंटरनेट आणि मोबाइल सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे, तर विष्णुपूर जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
मणिपूरच्या खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये मैतेई संघटनेच्या नेत्यासह अनेक जणांना अटक केल्यानंतर हिंसाचार उसळला. निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांशी त्यांची झटापटही झाली. निदर्शकांनी रस्त्यांवर अनेक ठिकाणी आगी लावल्या, बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोडही केली. आंदोलकांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची धमकीही दिली असून याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये अनेक आंदोलक उभे राहून स्वतःवर पेट्रोल ओतत असल्याचे दिसत आहे. टेंगगोल यांना अटक केल्यानंतर इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
त्यानंतर, राजधानी इम्फाळच्या अनेक भागात निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. इम्फाळच्या खुराई लामलोंग भागात, निदर्शकांच्या संतप्त जमावाने बस जाळल्या, टायर जाळून रस्ते अडवले. निदर्शक इथेच थांबले नाहीत, तर ते इम्फाळ विमानतळाच्या तुलिहाल गेटबाहेर जमले. निदर्शकांनी रात्री विमानतळ रस्त्यावरील वाहतूकही रोखली. या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान, लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बिष्णुपूर जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंगमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अरामबाई यांच्या अटकेच्या आडून काही असामाजिक तत्त्वे समाज माध्यमांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रक्षोभक संदेश, चित्रे आणि व्हिडीओ प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे शांतता प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. गृह विभागाचे सचिव एन. अशोक म्हणाले, की या घटनांमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन परिस्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे असामाजिक तत्त्वे त्यांचा अजेंडा राबवू शकणार नाहीत.
दोन वर्षांपासून मणिपूर अशांत
मणिपूर ३ मे २०२३ पासून अशांत आहे. मैतेई बहुल आणि कुकी बहुल परिसरात हिंसा झाली. तेव्हापासून हे दोन्ही समाज एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातून त्यांच्यात हिंसा झाली आहे. कुकी समाजाला सध्या राज्यात अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्यात आला आहे. मैतेई समाजही अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे, तर कुकी समाजाने मैतेईंच्या या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तेव्हापासून दोन्ही समाजांत सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी ९ मे रोजी पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे.