मणिपूर पुन्हा पेटले; बॉम्बहल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू, सीआरपीएफ गोळीबारात २ ठार; चार जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

जवळपास तीन वर्षांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हिंसाचाराचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका भीषण बॉम्ब हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे.
मणिपूर पुन्हा पेटले; बॉम्बहल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू, सीआरपीएफ गोळीबारात २ ठार; चार जिल्ह्यांमध्ये संचारबंदी
मणिपूर पुन्हा पेटले; बॉम्बहल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू, सीआरपीएफ गोळीबारात २ ठार; चार जिल्ह्यांमध्ये संचारबंदी
Published on

इम्फाळ : जवळपास तीन वर्षांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हिंसाचाराचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका भीषण बॉम्ब हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. यानंतर संतप्त जमावाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर झालेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने बॉम्बस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याचा निर्णय घेतला आणि इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, बिष्णुपूर आणि काकचिंग या चार जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

मंगळवारी पहाटे १ च्या सुमारास मोइरांग त्रोंग्लाओबी परिसरातील एका घरावर संशयित दहशतवाद्यांनी बॉम्ब टाकला. हा स्फोट इतका भीषण होता की, घरात झोपलेल्या ५ वर्षांच्या मुलाचा आणि अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. त्यांची आई या घटनेत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे नवीन हिंसाचार सत्र दोन महिने जुन्या सरकारला अस्थिर करण्यासाठी घडवून आणले जात आहे. राज्यात जेव्हा जेव्हा शांततेचे प्रयत्न सुरू होतात, तेव्हा प्रस्थापित हितसंबंधांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणले जातात, असे मुख्यमंत्री वा. खेमचंद सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी जनतेला बंद, रस्ता रोको आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे.

आत्मसंरक्षणासाठी गोळीबार

आंदोलकांनी बॉम्ब हल्ल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या गेलमोल येथील सीआरपीएफ कॅम्पवर मोर्चा वळवला. संतप्त जमावाने कॅम्पमध्ये घुसून तेथील वाहनांची जाळपोळ केली आणि मालमत्तेची तोडफोड केली. जमावाने कॅम्पमध्ये शिरून तोडफोड आणि जाळपोळ सुरू केल्यामुळे सुरक्षा रक्षकांना गोळीबार करावा लागला. हा गोळीबार आत्मरक्षणासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आला. दुर्दैवाने, यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गोळी लागल्याने जखमी झाले आहेत, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. गुन्हेगारांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी, परिसरात सध्या मोठी 'कॉम्बिंग ऑपरेशन' (झाडाझडती मोहीम) राबवण्यात येत आहे. पोलीस, आसाम रायफल्स आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, शोधकार्यासाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जात आहे.

३ दिवस इंटरनेट बंद

या घटनेनंतर खोऱ्यातील पाच जिल्ह्यांत तणाव वाढला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने पुढील तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अफवा पसरू नयेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंग यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, हा हल्ला म्हणजे मानवतेवरील क्रूर हल्ला असून मणिपूरमधील शांतता भंग करण्याचा हा थेट प्रयत्न आहे. या भ्याड कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शोधून काढले जाईल आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा दहशतवादी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.

ज्या भागात हा हल्ला झाला, तो भाग चुरचंदपूर या पहाडी क्षेत्राजवळ आहे. मेईतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षामुळे २०२३ आणि २०२४ मध्येही या भागात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक आमदारांनी या हल्ल्याला 'दहशतवादी कृत्य' संबोधत कुकी अतिरेक्यांवर संशय व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in