नवी दिल्ली : मणिपूरमधील ढासळत्या स्थितीबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठविले असून त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मणिपूरमधील जनतेला आपल्या घरात शांततेने आणि सन्मानाने राहता येईल यासाठी राष्ट्रपतींनी पुढाकार घ्यावा, असे खर्गे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात केंद्र आणि राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असे खर्गे यांनी आपल्या दोन पानांच्या पत्रामध्ये म्हटले आहे. राज्यात गेल्या १८ महिन्यांपासून झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकामध्ये महिला आणि लहान मुलांसह ३०० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत, असे काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले आहे.
ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीमुळे एक लाखाहून अधिक जण बेघर झाले असून त्यांना नाइलाजास्तव मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. मणिपूर धुमसत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे फिरकलेच नाहीत हे अनाकलनीय आहे, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर देशाच्या राष्ट्रपती आणि घटनेच्या रक्षणकर्त्या म्हणून मणिपूरच्या प्रश्नामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा आणि तेथील जनतेचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण कसे होईल ते पाहावे. आपण हस्तक्षेप केल्यास मणिपूरमधील जनता पुन्हा एकदा सुखासमाधानाने आपल्या घरात सन्मानाने जगू शकेल, असा आपल्याला विश्वास आहे, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
ब्रॉडबॅण्ड सेवांवरील स्थगिती उठविली
मणिपूर सरकारने तीन दिवसांपूर्वी ब्रॉडबॅण्ड सेवांवरील दिलेली स्थगिती काही अटी घालून उठविली आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावत असलेल्या समस्या, आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था आणि अन्य आस्थापना याबाबत सारासार विचार करून ही स्थगिती उठविण्यात आली आहे. तथापि, भ्रमणध्वनी इंटरनेट सेवा स्थगितच राहणार आहे.
मोदींनी हस्तक्षेप करण्याची इरोम शर्मिला यांची मागणी
मणिपूरमधील संघर्ष निवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट हस्तक्षेप आवश्यक आहे, असे मानवी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी म्हटले आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये ‘अफ्स्पा’ लागू करण्यात आल्याने स्थिती अधिक बिघडू शकते, असेही शर्मिला यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही शर्मिला यांनी केली आहे. केंद्र सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही, मोदी प्रत्येक राज्यात जातात, मात्र मणिपूरमध्ये ते फिरकलेच नाहीत, मोदी यांनी थेट हस्तेक्षप केल्यास स्थिती सुधारण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.
रिकाम्या शवपेट्यांसह मोर्चा
मणिपूरच्या चुराचंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी शेकडो लोकांनी रिकाम्या शवपेट्या घेऊन मोर्चा काढला आणि हिंसाचारात मरण पावलेल्यांना न्याय देण्याची मागणी केली. डोंगराळ प्रदेशासाठी स्वतंत्र प्रशासन देण्याची आणि ठार झालेल्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे फलक मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात होते.
‘अफ्स्पा’ निषेधार्थ मोर्चा
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या ‘अफ्स्पा’ कायद्याच्या निषेधार्थ विविध नागरी संघटनांनी मंगळवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी झुगारून मोर्चा काढला होता. मात्र, हा मोर्चा केइसंपतजवळ पोलिसांनी अडविला.