मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ यांच्यासमवेत भाजपचे कमळ हाती घेणार
मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘कमळ’ हाती घेतल्यानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेसुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जोर धरू लागला आहे. त्यातच आता पंजाबमधील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात असून ते कधीही प्रवेश करू शकण्याची शक्यता आहे. यावेळी मनीष तिवारी आनंदपूर साहिबऐवजी लुधियाना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवू इच्छित असल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

लुधियाना जागेसाठी भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याचे भाजप वरिष्ठांना कळवण्यात आले आहे. मनीष तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र भाजप प्रवेशाबाबतच्या अफवांना मनीष तिवारींच्या कार्यालयाने निवेदन जारी करून पूर्णविराम दिला आहे. “मनीष तिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा निराधार आहे. ते त्यांच्या मतदारसंघात असून तेथील विकासकामांवर देखरेख करत आहेत. शनिवारी रात्रीच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला,” असे या निवेदनात म्हटले आहे.

मनीष तिवारी हे खासदार आणि वकीलही आहेत. १७व्या लोकसभेत ते पंजाबमधील आनंदपूर साहिब येथून काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ ते २०१४ पर्यंत ते माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच २००९ ते २०१४ पर्यंत लुधियानाचे खासदार होते. यूपीए सरकारच्या काळात ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते. तिवारी हे १९८८ ते १९९३ पर्यंत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तसेच १९९८ ते २००० पर्यंत भारतीय युवक काँग्रेस (आय) चे अध्यक्ष होते. २००४च्या लोकसभा निवडणुकीत ते हरले, पण २००९च्या लोकसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवाराचा पराभव करून तिवारी विजयी झाले. मार्च २०१४ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.

कमलनाथ यांच्यासोबत २२ आमदार भाजपमध्ये?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ यांच्यासमवेत भाजपचे कमळ हाती घेणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे ठिकाण आणि वेळ ठरवण्यात येणार आहे. मात्र येताना कमलनाथ यांनी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार घेऊन यावेत, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेसचे ६३ पैकी २२ आमदार कमलनाथ यांच्यासोबत जाण्यास उत्सुक असल्याचे समजते. २२ पेक्षा जास्त आमदार सोबत आल्यास त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला सांगितले जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in