डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन! मुलीने दिला मुखाग्नी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन! मुलीने दिला मुखाग्नी
Published on

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

डॉ. सिंग यांचे पार्थिव लष्कराच्या गाडीतून दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. तेथे तिन्ही दलांनी त्यांना सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर, मोठी मुलगी उपिंदर सिंग, दुसरी मुलगी दमन सिंग आणि तिसरी मुलगी अमृत सिंग उपस्थित होत्या. त्यांची मुलगी उपिंदर सिंग यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी, प्रियांका वढेरा, राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही यावेळी उपस्थित होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे मान्यवरांनी तसेच लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली. मनमोहन सिंग यांचे पार्थिव नेणाऱ्या गाडीत राहुल गांधी बसले होते.

केंद्र सरकारकडून त्यांचा अपमान - राहुल

डॉ. सिंग यांच्या स्मारकासाठी भूखंड न दिल्याने वाद वाढत आहे. शीख धर्माच्या पहिल्या पंतप्रधानाचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करून केंद्र सरकारने त्यांचा अपमान केला आहे. डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कार व स्मारकासाठी भाजप सरकार एक हजार गज जमीन देऊ शकली नाही, हे ऐकून मी गप्प झालो. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार हे राजघाटावर केले जात होते. केंद्रीय गृह खात्याच्या उत्तरानंतर काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, सरकार स्मारकासाठी जमीन शोधू शकले नाही हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अपमान आहे. डॉ. सिंग यांचे स्मारक शक्तिस्थळ किंवा वीरभूमीजवळ बनवावे, अशी सूचना प्रियांका वढेरा यांनी केली.

योग्य जागेचा शोध सुरू - केंद्र सरकार

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांनी केंद्राकडे डॉ. सिंग यांच्या समाधीसाठी जागेची मागणी केली होती. त्यावर केंद्रीय गृह खात्याने सांगितले की, डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी निगमबोध घाटाची निवड केली. त्यांचे स्मारक दिल्लीत बनेल. त्यासाठी योग्य जागा शोधली जाईल. ट्रस्ट बनवण्यात येईल. या प्रक्रियेला वेळ लागेल.

काँग्रेसनेच डॉ. सिंग यांचा सन्मान केला नाही - भाजप

भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेसने डॉ. सिंग यांचा सन्मान कधीच केला - नाही. आता त्यांच्या निधनानंतर राजकारण केले जात आहे. भूसंपादन, ट्रस्टची स्थापना आदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल.

भाजप प्रवक्ते सी. आर. केसवन म्हणाले की, संपुआ सरकारने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे दिल्लीत स्मारक उभारले नाही. त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयातही ठेवले नाही. पंतप्रधान मोदी यांनी राव यांना 'भारतरत्न' ने सन्मानित केले.

logo
marathi.freepressjournal.in