नरवणेंच्या पुस्तक वादावर प्रकाशन कंपनीचा खुलासा; पुस्तक अद्याप प्रकाशित नाही, प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे!

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून प्रकाशन रखडले असून या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशक पेंग्विन रॅँडम हाऊसने निवेदन जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, जनरल नरवणे यांनीही प्रथमच मौन सोडल्याने प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नरवणेंच्या पुस्तक वादावर प्रकाशन कंपनीचा खुलासा; पुस्तक अद्याप प्रकाशित नाही, प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे!
नरवणेंच्या पुस्तक वादावर प्रकाशन कंपनीचा खुलासा; पुस्तक अद्याप प्रकाशित नाही, प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे!
Published on

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून पुस्तकाचे प्रकाशन रखडलेले आहे. या पुस्तकावरून मोठा वाद उफाळून आलेला असतानाच आता या पुस्तकाची प्रकाशन कंपनी पेंग्विन रॅँडम हाऊसने एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, जनरल नरवणे यांनीही याप्रकरणी प्रथमच मौन सोडल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. सदर पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, पुस्तकाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे असून आतापर्यंत या पुस्तकाच्या प्रती, छापील अथवा डिजिटल स्वरूपामध्ये प्रकाशित, वितरित, विक्री किंवा अन्य कोणत्याही प्रकारे जनतेसाठी उपलब्ध करू देण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे या पुस्तकाचा कोणताही भाग आमच्याकडून कोठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुस्तकाचे कोणत्याही प्रतीचे प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपात प्रसारण करणे हे कॉपीराइटचे उल्लंघन आहे.

एफआयआर

सध्या प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाच्या कोणत्याही आवृत्तीमध्ये कॉपीराइट उल्लंघन असून त्या त्वरित बंद केल्या पाहिजेत. पुस्तकाच्या बेकायदेशीर आणि अनधिकृत प्रसाराविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पुस्तक प्रकाशन हाऊसने दिला आहे. या पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्या ऑनलाईन प्रसारित झाल्याचा आरोप करण्यात आला असून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

पुस्तकामध्ये काय?

जानेवारी २०२४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार होते, मात्र त्यामधील दोन मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला होता. एका वृत्तसंस्थेने त्यामधील काही उतारे प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय लष्कराने पुस्तकाची तपासणी केली. या उताऱ्यांमध्ये २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख होता. पूर्व लडाखमधील भागात चीनचे रणगाडे भारतीय चौक्यांच्या अगदी जवळ आले होते. या तणावाच्या क्षणी राजकीय नेतृत्वाकडून म्हणजेच पंतप्रधान अथवा संरक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट आदेश मिळण्यास विलंब झाला आणि निर्णय घेण्याचा अधिकार लष्करावरच सोपविण्यात आला, असे पुस्तकामध्ये नमूद आहे.

प्रकाशन का रखडले?

या पुस्तकाची लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून छाननी केली जात आहे. संरक्षण दलाच्या नियमांनुसार लष्करी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सेवेशी संबंधित बाबी प्रसारमाध्यमांना देण्यास मनाई आहे.

नरवणे यांनी सोडले मौन

माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी पुस्तकावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपले मौन सोडले आहे. पेंग्विन प्रकाशन संस्थेने जारी केलेले स्पष्टीकरण सोशल मीडियावर पुन्हा शेअर करीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. पुस्तकाची सध्याची स्थिती ही आहे, असे लिहित नरवणे यांनी, पेंग्विनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाचा स्क्रीन शॉट ‘एक्स’वर शेअर केला आहे.

नरवणे खोटे बोलत असतील किंवा प्रकाशन कंपनी - राहुल

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापलेल्या नाहीत, असे पेंग्विन रॅँडम हाऊसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले असून त्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. एक तर मनोज नरवणे खोटे बोलत असतील किंवा पुस्तकाची प्रकाशन कंपनी खोटे बोलत असेल, असे राहुल यांनी म्हटले आहे.

नरवणे यांनी एक् ट्विट केले आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, माझ्या पुस्तकासाठी या लिंकला फॉलो करा, असे सांगत राहुल यांनी माध्यमांना त्या ट्विटचा फोटो दाखविला. ते पुढे म्हणाले की, नरवणे खोटे बोलत असतील किंवा प्रकाशक कंपनी खोटे बोलत असेल, परंतु नरवणे खोटे बोलत असतील असे आपल्याला वाटत नाही, असे राहुल म्हणाले. प्रकाशन कंपनीने हे पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचे म्हटले आहे, तरीही हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. त्यामुळे माझा प्रकाशन कंपनीपेक्षा नरवणे यांच्यावर जास्त विश्वास आहे. नरवणे यांनी पुस्तकामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या भारत सरकार आणि पंतप्रधानांसाठी अडचणीच्या आहेत, असा हल्ला राहुल यांनी सरकारवर चढविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in