भारतात बनणार ‘सी-२९५’ विमाने; देशातील पहिल्या खासगी लष्करी विमाननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

भारतीय हवाई दलाचे ‘महाबली’ ‘सी-२९५’ विमान आता भारतातच तयार होणार आहे.
भारतात बनणार ‘सी-२९५’ विमाने; देशातील पहिल्या खासगी लष्करी विमाननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
Published on

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे ‘महाबली’ ‘सी-२९५’ विमान आता भारतातच तयार होणार आहे. वडोदरा येथे देशातील पहिल्या खासगी लष्करी विमान उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेझ यांनी सोमवारी केले. हा प्रकल्प भारतातील खासगी विमान उद्योगाचा पहिलाच अंतिम जुळणी प्रकल्प आहे. याचा अर्थ या प्रकल्पातून निर्मिती होणारे विमान थेट उड्डाणासाठी तयार असेल.

‘टाटा ॲॅडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड’च्या या कारखान्यात एअरबसची ‘सी-२९५’ विमाने तयार केली जातील. हा प्रकल्प विमाननिर्मिती, उत्पादनासाठी लागणारी यंत्रणा व संरक्षण क्षमतेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत अनेक प्रकल्प भारतासाठी महत्त्वाचे आहेत. हा प्रकल्प भारतात आल्याने भारतातून विमानांच्या निर्यातीला वाव मिळू शकेल.

‘सी-२९५’ची वैशिष्ट्ये

‘सी-२९५’ हे विमान छोट्या धावपट्टीवर उतरवता येते. त्यामुळे हे विमान चीनच्या जवळच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषा व भारताच्या समुद्री सीमेवर आदर्श ठरू शकते. या विमानाचा सर्वाधिक वेग ताशी ४८२ किमी आहे. त्यातून ९ टन माल व ७१ सैनिक किंवा ४८ पॅराट्रूपर नेले जाऊ शकतात. ‘सी-२९५’ हे विमान सर्व प्रकारच्या धावपट्टीवर वापरण्यास पोषक आहे. यात दोन टर्बोट्रॉप इंजिन आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल इंटिजिलन्स, वैद्यकीय आणीबाणी, समुद्रात टेहळणीच्या वेळी आकाशात इंधन भरण्याची क्षमता आदी सुविधा त्यात आहेत.

भारतात ४० विमानांची निर्मिती

‘सी-२९५’ प्रकल्प ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतातच वस्तू बनवण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. या प्रकल्पात एकूण ५६ विमाने बनवली जाणार आहेत. त्यात एअरबस स्पेन आपल्या विमान कारखान्यातून १६ ‘सी-२९५’ विमाने भारताला देणार आहे, तर ४० विमाने ही ‘टाटा ॲॅडव्हान्स सिस्टीम लि.’कडून बनवली जातील. आतापर्यंत एअरबसकडून भारतीय हवाई दलाला पाच ‘सी-२९५’ विमाने पुरवण्यात आली आहेत.

गुजरातमध्ये रोजगार वाढणार

या प्रकल्पामुळे गुजरातमध्ये विमान उत्पादन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत बंगळुरू, हैदराबाद येथे विमान उत्पादने होत होती. या प्रकल्पामुळे ३ हजारांहून अधिक प्रत्यक्ष, तर १५ हजार अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील.

हे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे - सचिन सावंत

महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस प्रकल्पाचे उद्घाटन गुजरातमध्ये करून मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा घणाघाती हल्ला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असताना महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात जाऊ देणे हे लाजिरवाणे आहे. टाटा एअरबसचा हा १.८ लाख कोटींचा प्रकल्प होता. यामुळे राज्यात रोजगार निर्मिती झाली असती, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे ७.५ लाख कोटींचे प्रकल्प गुजरातमध्ये

भाजप सरकारने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटींची गुंतवणूक व ५ लाख रोजगार महाराष्ट्रातून पळवून नेले आहेत. मोदी यांनी हिंदुस्थान विरुद्ध गुजरात असे चित्र निर्माण केले आहे. सर्व महत्त्वाचे प्रकल्प जर गुजरातला घेऊन गेले तर इतर राज्यांचे काय होणार, असा प्रश्न विचारून, महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा गुजरातला का पळवला, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता मतदानातून देईल, असे काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक आणि मुंबईतील मीडिया प्रभारी चयनिका उनियाल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in