सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठीचा झेंडा; सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत लळित यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले.
सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठीचा झेंडा; सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी मंगळवारी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे लळित यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर पुन्हा एकदा मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत लळित यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले. लळित ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. यानंतर लळित यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती असून, ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची कारकीर्द

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट पदवी अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कूलमधून घेतली.

धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.

१९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी चंद्रचूड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश

धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांनी २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या काळात सरन्यायाधीशपदावर काम केले. धनंजय चंद्रचूड यांच्या आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in