दिल्लीत आजपासून सारस्वतांचा मेळा; पंतप्रधान करणार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

यंदाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे.
दिल्लीत आजपासून सारस्वतांचा मेळा; पंतप्रधान करणार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन
@PawarSpeaks
Published on

राकेश मोरे/नवी दिल्ली

साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांचा मेळा. अनेक दिग्गज साहित्यिक या संमेलनात सहभागी होत असतात. त्यांचे विचार आणि साहित्यावरील चर्चा ऐकण्यास साहित्य रसिक आतुर असतात. यंदाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, चर्चा असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. २१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० ला विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून, याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून, तिथे इच्छुक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल.

‘संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा’ या पुस्तकाचे प्रकाशन

पत्रकार निलेशकुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र भवन येथे पार पडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पत्रकार निलेशकुमार कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिले असून, यात भारतीय लोकशाहीचा इतिहास आणि वर्तमानाचा धांडोळा घेण्यात आला आहे. ‘संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा’ या पुस्तकात देशाच्या लोकशाहीचा प्रवास चितारण्यात आला आहे. संसद भवनाचा इतिहास, ऐतिहासिक घटनाक्रम, संसदेतील ऐतिहासिक भाषणे, आजवरच्या पंतप्रधानांनी देशासाठी दिलेले योगदान, पंतप्रधान निवडीवेळी पडद्याआड रंगलेले राजकारण, लोकसभा सभापतींनी उमटवलेला ठसा, महाराष्टातील नेत्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात उमटविलेल्या कार्यकर्तृत्वाच्या मुद्रा, संसदेतील काही हळूवार मिश्कील प्रसंग तसेच काही कटू प्रसंगही या पुस्तकातून रेखाटलेले आहेत.

तालकटोरा ठिकाणच का?

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमला ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे पानिपतचे युद्ध लढले, तेव्हा याच ठिकाणावर तळ ठोकून होते. त्यामुळे त्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ठिकाणी २८ नोव्हेंबर १९७४ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी स्टेडियमचे उद‌्घाटन केले होते. मराठ्यांनी तालकटोरा भागात आपला पराक्रम गाजवला, म्हणून त्याच ठिकाणी मराठीचा जागर होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in