
राकेश मोरे/नवी दिल्ली
मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहे. मराठी भाषेचे महत्त्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी जिवंत ठेवली. भाषा जीवनात वापरात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जिवंत राहते. या सर्वांमुळे मराठी भाषेला एक अभिजातपण मिळाले आहे, असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जिवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. पंतप्रधानांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्घाटनाचे दुसरे सत्र संध्याकाळी उशिरा छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात पार पडले. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच संमेलनाचे दोनदा उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते.
जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा?
संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, आता आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे. परंतु, त्याचा भंडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी १३ आणि १४ व्या शतकातमध्ये केला आहे. ज्यावेळेला लिपी आणि लिहिण्यावाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हते. स्त्री मुक्तीच्या उद्गात्या आणि झेंडा फडकवणाऱ्या म्हणायचं की नाही? म्हणजे आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशाप्रकारचे विचार आमच्या या स्त्रियांनी, संत स्त्रियांनी निरनिराळ्या जातीजमातीच्या स्त्रियांनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या आहेत. त्या जातीच्या स्त्रिया ज्यावेळेला बोलतात त्यावेळेस त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि संवेदनशीलता, भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत.
प्रतिभा ही महिलांमध्ये उपजत निर्मितीच्या दृष्टीने ज्याला आपण कला म्हणत असतो ती कला म्हणजे दुसरं काय असतं ? संवेदनशीलता नेमक्या शब्दात उतरवणं, याच्यासाठी जी प्रतिभा लागते, ती प्रतिभा या बायकांच्याजवळ उपजत आहे आणि ती अनुभवातून परिपक्व झालेली आहे. ह्यांच्याकडे आम्ही या संबंध इतिहासाच्या प्रवाहामध्ये लक्ष देणार आहोत की नाही ? असा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आपण लक्ष न देता पुढे चाललेले आहोत आणि आम्ही सुधारलेले आहोत, असे आपण म्हणत असतो, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी खंत व्यक्त केली.
‘फुरोगामी’ काहीही म्हणो, आमचे संत पुरोगामी!
‘फुरोगामी’ काहीही म्हणो, आमचे संत खरोखरच पुरोगामी होते. त्यामुळे पंतप्रधान महाशय, तुम्हाला भेट म्हणून दिलेली विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती ही आमच्या उदारपणाचे प्रतीक आहे. देशाच्या पंतप्रधानांना आज आपण ज्या विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती दिली, ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. ते आपल्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहे. कारण, हा विठ्ठल आला कुठून? तर 'कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू' म्हणजे हा कर्नाटकातून आला आणि महाराष्ट्रात स्थिरावला. आजही वारीसाठी केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर कर्नाटक व तेलंगणातूनही असंख्य लोक येतात. हा विठ्ठल मराठी माणसांसारखा साधा आहे. कष्टकरी माणसांसारखा आहे, असे डॉ. भवाळकर म्हणाल्या.
संमेलनाध्यक्षा पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे स्वराज्य स्थापन केले? याचे विश्लेषण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले. ते म्हणाले, संतांनी शिवाजी महाराजांसाठी भूमी निर्माण केली होती. कारण, मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते. ती एक जैविक गोष्ट आहे. भाषा बोलली तर ती जिवंत राहते. केवळ पुस्तके व ग्रंथांतून ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे.
मराठी साहित्याचा उगम कुठे झाला? अमूक साली शाळा निघाली आणि माणसे शिकायला लागली, हे आमचे आधुनिक पांडित्य झाले. ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळासाठी गायली, त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली, असे त्यांनी सांगितले.
'कांदा मुळा भाजी,
अवघी विठाबाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी',
असा सांगणारा आमचा सावता माळी. त्याने ही मराठी भाषा जिवंत ठेवली. आमचा हा विठू सर्वांना आपल्या पदराखाली व सावलीखाली घेणारा आहे. या संतांच्यामध्ये अंत्यजन म्हणजे आज ज्याला आपण बीसी व ओबीसी म्हणतो, ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत. ते कुठल्याही शाळेत शिकले नाहीत. त्यांना कुणीही शिकवले नाही. तरीही ते मराठीत काव्य करत होते. याचा अर्थ मराठी केवळ लिखित स्वरुपात नाही, ती बोलीतून निर्माण झाली, बोलीतून पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातील मावळे मिळाले. ही भाषा त्यांच्यामुळे जिवंत राहिली. कोणतीही भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते. त्यामुळे भाषा ही तोडणारी नव्हे तर जोडणारी असली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संत ज्ञानेश्वर यांचे ‘पसायदान’ काश्मीरमधील शमीमा अख्तर यांनी गायिल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जल्लोषात प्रारंभ
दिल्ली येथे सुरू झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जल्लोषात सुरुवात झाली. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी पारंपरिक पोशाखात अनेक ग्रंथप्रेमी या दिंडीत सहभागी झाले होते. सकाळी जुन्या संसद भवनापासून ही ग्रंथदिंडी निघाली होती. त्यात सहभागी झालेला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा भव्य चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
संमेलनात गोंधळ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी येथे निमंत्रण पत्रिकांच्या वाटपामध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. निमंत्रित साहित्यिक, पत्रकार, इतकेच नाही तर आयोजकांच्या निमंत्रण पत्रिका तयार नसल्यामुळे साहित्य सेवा कक्षाच्या बाहेर गोंधळ उडाल्याचे निदर्शनास आले. आयोजक आणि व्यवस्थापनाच्या या गोंधळामुळे, झालेल्या गैरसोयीमुळे आयोजकांवर साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली.