
नवी दिल्ली : वैवाहिक बलात्कार प्रकरणात पतीला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी चार आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने आता नव्या पीठासमोर सुनावणी घ्यावी लागणार आहे.
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठात न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा हे अन्य न्यायाधीश असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सुरू झाली. स्वतंत्रपणे युक्तिवाद करण्यासाठी प्रत्येक वकिलास किती कालावधी लागेल, अशी विचारणा पीठाने केली होती.
त्यानंतर ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी आपल्याला युक्तिवादासाठी किमान एक दिवसाचा कालावधी लागेल, असे सांगितले. त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राकेश द्विवेदी, इंदिरा जयसिंह यांनीही एक दिवसाचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले.
नव्या पीठासमोर होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयास २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याने सरन्यायाधीशांकडे या प्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी राहणार आहे. या आठवड्यात युक्तिवाद पूर्ण झाला नाही तर आपल्याला निवृत्त होण्यापूर्वी निर्णय देणे कठीण होईल, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. त्यामुळे चार आठवड्यांनंतर याची सुनावणी नव्या पीठासमोर घेण्याचे पीठाने स्पष्ट केले.