

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विरोधक म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे गुरुवार, २६ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येताहेत. यावेळी कॅनडा सोबत भारताचे अनेक महत्त्वाचे करार होतील. अलीकडे ट्रम्प हे अनेकदा भारतविरोधी भूमिका घेत असतात. त्यामुळे कॅनडासोबत होणारे करार हे ट्रम्प यांच्या नक्कीच जिव्हारी लागतील. टॅरिफ आणि व्यापाराच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांसोबत पंगा घेतला आहे.
ट्रम्प यांच्या जखमेवरमीठ चोळण्यासारखे
चीन, ब्राझील यांच्यासह कॅनडाबरोबरचे अमेरिकेचे संबंधही बिघडलेले आहेत. ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना अनेक व्यापारी इशारेही दिले आहेत. हेच मार्क कार्नी २६ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी भारत-कॅनडामध्ये अनेक महत्त्वाचे व्यापारी करार होतील. हे एकप्रकारे ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असेल. कारण सध्या कार्नी हे ट्रम्प यांच्या रडारवर आहेत. कॅनडाचे कार्नी २६ फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया आणि जापान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.
दोन देशांमध्ये होतील व्यापार करार
दोन्ही नेते कॅनडा आणि भारताचे संबंध अधिक भक्कम करणं, पुढे नेणं यावर चर्चा करतील. खासकरून व्यापार, ऊर्जा, टेक्नोलॉजी, AI, प्रतिभा, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रात नव्या भागीदाऱ्या बनवण्यावर भर असेल. कार्नी भारतात बिझनेस लीडर्सची सुद्धा भेट घेतील, जेणेकरून कॅनडात गुंतवणूक वाढवता येईल. दोन्ही देशांमध्ये व्यापारिक करार होतील.
कॅनडाचा भर अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करण्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी जून २०२५ मध्ये मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला गेले होते. ‘जगात वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कॅनडा आपल्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवण्यासह आत्मनिर्भर बनवण्यावर जोर देत आहे. सरकार देशात मजबुती आणणे, परदेशात व्यापार वाढवणे आणि मोठ्या परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या दिशेने काम करत आहे’, असे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
व्यापार २०३० पर्यंत ७० अब्ज डॉलरपर्यंत नेणार
कॅनडा २०२४ मध्ये भारताचा सातवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांमध्ये वस्तू आणि सेवांचा दुतर्फा व्यापार ३०.८ ते ३१ अब्ज डॉलरचा होता. २०२५ मध्ये जी २० शिखर परिषदेच्यावेळी दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक भागीदारी करारावर औपचारिक चर्चा सुरू करण्यास सहमती दिली होती. आता २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार ७० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा उद्देश आहे.
कार्नी यांच्या दौऱ्याची सुरुवात मुंबईपासून
त्यांच्या कार्यालयाने अधिकृत स्टेटमेंट जारी करून याची माहिती दिली आहे. व्यापार, ऊर्जा, टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि संरक्षण या क्षेत्रात नव्या संधींचा शोध घेणे हा कॅनडाचे कार्नी यांच्या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश आहे. कार्नी आपल्या दौऱ्याची सुरुवात मुंबईपासून करणार आहेत. त्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. कार्नी यांचा हा पहिला भारत दौरा आहे.