नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य २८२.६६ लाख कोटींवर

भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी मजबूत झाला असून ७९.७१ झाला
नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य २८२.६६ लाख कोटींवर

दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी तेजी परतल्याने दोन्ही निर्देशांक १ टक्का वधारले. तर मुंबई शेअर बाजारतील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य सार्वकालिक उच्चांकी २८२.६६ लाख कोटींवर गेले आहे. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी मजबूत झाला असून ७९.७१ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स गुरुवारी ६५९.३१ अंक किंवा १.१२ टक्के वधारुन ५९,६८८.२२ वर बंद झाला. दिवसभरात तो ६८३.०५ अंकांन वधारुन ५९,७११.९६ ही कमाल पातळी गाठली होती. मागील दोन सत्रात सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. शेअर बाजारात तेजी परतल्याने बीएसईतील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य २,८२,६६,६९६.९२ कोटी रुपये झाले. त्यामुळे गुंतवणूकदार गुरुवारी १.७९ लाख कोटींनी श्रीमंत झाले. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ‌्टी १७४.३५ अंक किंवा ०.९९ टक्का वधारुन १७,७९८.७५वर बंद झाला. ३३ कंपन्यांच्या समभागात वाढ झाली.

वॉल स्ट्रीट बाजारात काल रात्री सकारात्मक वातावरण होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारात तेजी परतल्याचे सांगण्यात येते.

सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्राचा समभाग सर्वाधिक ३.२३ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, इंडस‌्इंड बँक आणि एशियन पेंटस‌् यांच्या समभागात मोठी वाढ झाली. टाटा स्टील, टायटन, एनटीपीसी, नेस्ले आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात घसरण झाली.

बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.६० टक्का तर मिडकॅपमध्ये ०.२९ टक्का वाढ झाली. एकूण कंपन्यांपैकी २,०६२ कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली, १४०२ समभागांमध्ये घसरण झाली. तसेच १२५ समभागांमध्ये कुठलाही बदल झाला नाही.

आशियाई बाजारात सेऊल आणि टोकियोमध्ये वाढ झाली तर शांघायमध्ये घट झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.४९ टक्का घट होऊन प्रति बॅरलचा भाव ८७.५७ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुधवारी भारतीय भांडवली बाजारात ७५८.३७ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in