लग्न फक्त शारीरिक सुख मिळवण्यासाठी नव्हे...

मुलाचा ताबा मिळवण्यावरून सुरू असलेल्या वादासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवले आहे.
लग्न फक्त शारीरिक सुख मिळवण्यासाठी नव्हे...

लग्न हे केवळ शारीरिक सुख मिळवण्यासाठी केले जात नाही. तर त्याचा मुख्य उद्देश संतान उत्पत्ती हा असतो. लग्न संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक विस्तार होतो. लग्नानंतर जन्माला आलेली संतती ही पती आणि पत्नीला जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास हायकोर्टाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांनी एका वकील जोडप्यामध्ये मुलाचा ताबा मिळवण्यावरून सुरू असलेल्या वादासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवले आहे. “पती-पत्नी म्हणून तुमचे नाते संपुष्टात येऊ शकते; मात्र आई-वडील म्हणून तुमचे मुलांसोबत असणारे नाते कधीच संपुष्टात येणार नाही. वेगळे झाल्यानंतर आई-वडिलांनी अन्य व्यक्तीसोबत पुन्हा लग्न केले, तरी प्रत्येक मुलासाठी त्याचे आई-वडील हे शाश्वत असतात,” असे या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रामस्वामी यांनी म्हटले आहे.

या प्रकरणामध्ये पत्नीने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत तिचा वकील पती मुलाला भेटू देत नसल्याचे म्हटले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पती उल्लंघन करत असल्याचा आरोप या महिलेने केला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. रामास्वामी यांनी विवाहसंस्थेसंदर्भात आपली मते व्यक्त केली. “पॅरेंटल एलिएनेशन हे मानवी मूल्यांविरोधात आणि मुलासाठी धोकादायक आहे. मुलाच्या मनामध्ये एखाद्या पालकाविरोधात द्वेषभाव निर्माण करणे, हे त्याला स्वत:विरोधात करण्यासारखा प्रकार आहे. लहान मुलांना जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आणि सज्ञान होईपर्यंत आई-वडील या दोघांच्या आधाराची गरज असते,” असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

...तर मुलांमध्ये द्वेषभावना निर्माण होते

आई-वडिलांविरोधातील द्वेष ही भावना मुलांमध्ये स्वाभाविकपणे निर्माण होत नाही. एखाद्या व्यक्तीकडून द्वेष करण्यासंदर्भातील शिकवण दिल्यानंतरच मुलांच्या मनात ही भावना निर्माण होते. मुलांचा पूर्णपणे ज्या व्यक्तीवर विश्वास असेल, तिच्याकडून शिकवण देण्यात आल्यास मुलांच्या मनात द्वेषभावना निर्माण होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ज्या पालकाकडे मुलांचा ताबा आहे, त्याला आपल्या विभक्त जोडीदाराबद्दल मुलांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करता येत नसेल तर हा पॅरेंटल एलिएनेशनचा प्रकार आहे, असेही न्यायमूर्ती रामास्वामी यांनी म्हटले आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in