डॉक्टर इंजिनिअर भासवून केलं १५ महिलांशी लग्न ; बिंग फुटताच पोलिसांकडून अटक

बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचा हा प्रताप 'तो मी नव्हेच' या जुन्या मराठी नाटकातील लखोबा लोखंडे या पात्राशी साधर्म्य दाखवणारा
डॉक्टर इंजिनिअर भासवून केलं १५ महिलांशी लग्न ; बिंग फुटताच पोलिसांकडून अटक

बंगळुरू : येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने डॉक्टर, इंजिनिअर असल्याचे भासवून किमान १५ बायकांशी लग्न केले. त्यातील एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचा हा प्रताप 'तो मी नव्हेच' या जुन्या मराठी नाटकातील लखोबा लोखंडे या पात्राशी साधर्म्य दाखवणाराच ठरला आहे.

महेश के. बी. नायक असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने इतक्या महिलांना फसवण्यासाठी विवाह जुळवण्याविषयक संकेतस्थळांचा (मॅट्रिमोनियल साइट्स) वापर केला. आपण डॉक्टर किंवा इंजिनिअर असल्याचे भासवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. आपण डॉक्टर असल्याचे महिलांना खरे वाटावे म्हणून त्याने खोटा दवाखाना उघडला असून, त्यात एक खोटी परिचारिकाही कामाला ठेवली होती. त्याच्या या भूलथापांना थोड्याथोडक्या नव्हे, तर २०१४ पासून तब्बल १५ महिला फसल्या आहेत. या सर्व महिलांशी त्याने लग्न केले. इतकेच नव्हे, तर त्यातील चार बायकांना त्याच्यापासून मुलेही झाली आहेत.

महेशचे बिंग फुटण्यात त्याच्या कच्च्या इंग्रजीने हातभार लावला. त्याने मॅट्रिमोनियल साइट्सवर कितीही उच्चशिक्षित असल्याचा दावा केला तरी प्रत्यक्ष भेटीत त्याच्या तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे लोकांना शंका येऊ लागली. त्यात भर म्हणून त्याने लग्न केलेल्या एका महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्याकडे दवाखाना उघडण्यासाठी पैशाचा तगादा लावू लागला. तिने नकार देताच तिचा छळ चालू केला. तिचे दागिनेही पळवून नेले. अखेर त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याशिवाय अन्य एका महिलेनेही फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार म्हैसूर पोलिसांना महेश याला टुमकूर येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर त्याच्या अन्य भानगडीही उघड झाल्या. महेशने लग्न केलेल्या सर्व महिला उच्चशिक्षित आणि नोकरी-व्यवसायात सुस्थापित आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्याने त्यांनी महेशकडे फारशी पैशाची मागणी केली नाही. महेशदेखील लग्न केलेल्या महिलांसोबत फारसा राहत नसे. त्यामुळे त्याचे हे कारभार लगेच उघडकीस आले नाहीत. महेशचे इंग्रजी चांगले असते, तर त्याने आणखी अनेक महिलांना भुलवले असते. फसवणूक झालेल्या अनेक तरुणींना महेशच्या बाहेरील भानगडी कळाल्या होत्या, पण समाजात अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी मौन बाळगले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in