
पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी मंगळवारी भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश असल्याचा अप्रत्यक्ष इशारा भारताला दिला.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा मरियम नवाज यांनी अद्यापही निषेध केला नाही, मात्र या घटनेबाबत पहिल्यांदाच भाष्य करताना “पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश आहे, त्यामुळे कोणीही सहज हल्ला करू शकत नाही,” असे त्या म्हणाल्या. लाहोरमध्ये आयोजित एका समारंभात त्या बोलत होत्या. “भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण पाकिस्तानच्या सैन्याला अल्लाहने शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याचा सामना करण्याची, देशाच्या रक्षणाची ताकद दिली आहे”, असे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानवर हल्ला करण्याआधी १० वेळेस विचार करा
"पाकिस्तानचा कोणताही शत्रू पाकिस्तानवर हल्ला करण्याआधी १० वेळेस विचार करेन, कारण पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न आहे, पाकिस्तानकडे अणू बॉम्ब आहे", असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना, “पाकिस्तान अण्वस्त्र सामर्थ्याने युक्त आहे, त्यामुळे कोणीही पाकिस्तानवर सहज आक्रमण करू शकत नाही. राजकीय मतभेद काहीही असो, पण आज आपण सर्वांनी पाकिस्तानी म्हणून एकत्र येत आर्मीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजं, जेणेकरुन त्यांना शत्रूविरुद्ध लढण्याचं बळ मिळेल” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आपले वडील व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कौतुक करत म्हणाल्या, “नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला अण्वस्त्र शक्ती बनवण्यासाठी ऐतिहासिक भूमिका बजावली.”विशेष म्हणजे नवाज शरीफ यांनीही अद्याप पहलगाम हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बघा व्हिडिओ -
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला मुँहतोड जवाब देण्यासाठी भारत सरकारने मंगळवारी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत सशस्त्र दलांना प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य आणि अचूक वेळ ठरविण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे.