केरळमध्ये पावसाचे थैमान! वायनाडमध्ये एकाच रात्रीत दोनदा भूस्खलन, आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू; शेकडो लोक बेपत्ता

Wayanad landslides : केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे.
बचावकार्य सुरू
बचावकार्य सुरूएक्स
Published on

केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे वायनाडमधील मेप्पडी, मुंडक्काई टाउन आणि चूरलमाला येथे भूस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मृतांचा आकडा सतत वाढत असून आतापर्यंत किमान ५४ लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. ५० हून अधिक लोकांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, शेकडो लोक बेपत्ता आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, मात्र पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

एकाच रात्रीत दोनदा भूस्खलन -

मुंडक्काई टाऊनमध्ये पहाटे १ वाजता मुसळधार पावसात पहिल्यांदा भूस्खलन झाले. तेथे बचावकार्य सुरू होते, पण त्याचवेळी पहाटे ४ वाजता चुरमलमाला शाळेजवळ दुसऱ्यांदा भूस्खलन झाले. ज्या शाळेचा उपयोग आसरा घेण्यासाठी केला गेला होता, ती शाळा आणि आजूबाजूची घरे आणि दुकाने पाणी आणि चिखलाने तुंबली गेली.

पूल कोसळल्याने बचावकार्यात अडथळे-

चुरल माला टाउनमधील पूल कोसळल्याने सुमारे ४०० कुटुंबे या प्रदेशात अडकून पडल्याचे वृत्त आहे. हा पूल मुंडक्काई येथील अट्टमला येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो कोसळल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. अनेक लोक जखमी झाले असून अनेक वाहने वाहून गेली आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने नुकसानीचा संपूर्ण आकडा समजू शकलेला नाही.

राज्य सरकारने बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली असून मद्रास रेजिमेंटचे मुख्यालय असलेल्या वेलिंग्टन येथून एक पथक वायनाडला रवाना झाले आहे. बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि कालपेटाचे आमदार टी सिद्दिकी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दल आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या टीम आधीच घटनास्थळी आहेत आणि अतिरिक्त NDRF टीम या भागात रवाना झाली आहे. या भागातील लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in