

नवी दिल्ली: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) बँकांच्या जोखीम व्यवस्थापन विभागातील ६० ते ७० टक्क्यांपर्यंतची कामे स्वयंचलित होऊ शकतात. त्यामुळे बँकांना उपलब्ध मनुष्यबळाचा उपयोग अधिक सखोल जोखीम विश्लेषण, धोरणात्मक निर्णयप्रक्रिया आणि एआय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी करता येईल, असे मॅकिन्सेच्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, माहिती संकलन, कागदपत्रांची पूर्तता, नियमपालनासंबंधी तपासणी आणि नियमित देखरेख आदी कामे एआयच्या मदतीने स्वयंचलित करता येतील. मात्र, गुंतागुंतीचे मूल्यमापन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी मानवी देखरेखीखालीच ठेवावी लागेल.
स्वयंचलित प्रक्रियांमुळे उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त कार्यक्षमतेपैकी निम्मी क्षमता अधिक सक्षम विश्लेषणात्मक यंत्रणा उभारणे, धोरणात्मक जोखीमविषयक सल्ला देणे आणि कर्ज पोर्टफोलिओबाबत वेगाने निर्णय घेण्यासाठी वापरता येईल. उर्वरित क्षमता विशेषीकृत एआय अभियांत्रिकी, डेटा गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानविषयक प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी वापरता येईल, असे मॅकिन्सेने स्पष्ट केले.
‘एआयवर आधारित कार्यप्रणालीमुळे प्रक्रियेचे स्वरूप आणि स्वयंचलितीकरणाची पातळी यानुसार ६० ते ७० टक्के मानवाच्या हातातून होणारी कामे कमी करता येऊ शकतात. मानवी पडताळणी आणि देखरेखीचा विचार केल्यानंतरही निवडक जोखीम व्यवस्थापन प्रक्रियांमध्ये ३० ते ६० टक्क्यांपर्यंत कार्यक्षमतेत संरचनात्मक सुधारणा साधता येऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.पारंपरिक पद्धतींमध्ये दरवर्षी ५ ते १० टक्के उत्पादकता वाढीचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, काही आघाडीच्या बँकांनी पुढील दोन ते तीन वर्षांत आपल्या जोखीम व्यवस्थापन विभागांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादकता वाढ साधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सध्या कर्जाचे मूल्यमापन, आर्थिक गुन्ह्यांवर देखरेख, नियामक नियमांचे पालन आणि जोखीम व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत एआयचा वापर सुरू झाला आहे. मोठ्या कॉर्पोरेट कर्जवितरण प्रक्रियेत एआयच्या सुरुवातीच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण कर्ज प्रक्रियेत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, या प्रक्रियेतून मिळणाऱ्या निष्पत्तीचा दर्जा सुमारे ९५ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.
एआय तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करणाऱ्या बँकांना खर्चात बचत, उत्पादकतेत वाढ आणि अधिक वेगवान व माहितीपूर्ण निर्णयप्रक्रियेच्या माध्यमातून स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो, असेही अहवालात म्हटले आहे.
कर्जदारांच्या आर्थिक अडचणींचे संकेत कळणार
आर्थिक माहिती, पतमानांकन आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून संभाव्य कर्जदारांच्या आर्थिक अडचणींचे संकेत एआयच्या माध्यमातून लवकर ओळखता येऊ शकतात. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वीच बँकांना संबंधित कर्जदारांबाबतच्या जोखमीचे पुनर्मूल्यांकन करणे शक्य होईल.