मेधा पाटकर यांना पाच महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा; २३ वर्षांपूर्वीचा बदनामीचा खटला

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतील न्यायालयाने २३ वर्षांपूर्वीच्या बदनामीच्या खटल्यात सोमवारी पाच महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
मेधा पाटकर यांना पाच महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा; २३ वर्षांपूर्वीचा बदनामीचा खटला
PTI
Published on

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतील न्यायालयाने २३ वर्षांपूर्वीच्या बदनामीच्या खटल्यात सोमवारी पाच महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना हे गुजरातमधील एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख असताना त्यांनी पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांचा विचार करून आणि खटला दोन दशकांहून अधिक कालावधीपूर्वीचा असल्याचा विचार करून पाटकर यांना शिक्षा ठोठावण्यात आली. पाटकर यांना या आदेशाविरुद्ध दाद मागता येणे शक्य व्हावे यासाठी शिक्षा एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आली आहे.

आरोपींचे वय, आजार पाहता त्यांना जास्त शिक्षा द्यावी असे वाटत नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि दंड किंवा दोन्ही लागू होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सक्सेना हे भित्रे आहेत आणि त्यांचा हवाला व्यवहारात सहभाग आहे, हे पाटकर यांचे वक्तव्य बदनामीकारक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने २४ मे रोजी नोंदविले होते.

logo
marathi.freepressjournal.in