हैदराबाद : करमणूक आणि माध्यम क्षेत्रात क्रांती घडविणारे माध्यम सम्राट आणि रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे शनिवारी श्वसनाच्या विकाराने येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि पुत्र असा परिवार आहे. श्वसनविकार बळावल्याने राव यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले, असे सूत्रांनी सांगितले. अविभाजित आंध्र प्रदेशातील माध्यम उद्योगात राव यांनी इनाडू वृत्तपत्र आणि ईटीव्ही समूह वाहिन्यांमार्फत सनसनाटी निर्माण केली. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना शोक
माध्यम सम्राट रामोजी राव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. करमणूक आणि माध्यम क्षेत्रातील त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, असे मुर्मू यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राव यांनी पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रावर आपला अमिट ठसा उमटविला, असे मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.