नवी दिल्ली : आफ्रिका खंडातील ५५ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आफ्रिकन युनियन (एयू) या संघटनेला जी-२० संघटनेचे स्थायी सदस्यत्व देण्यात येत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान जाहीर केला.
या औपचारिक घोषणेनंतर लगेचच आफ्रिकन युनियनचे प्रमुख अझाली असौमनी यांनी जी-२०चे संपूर्ण सदस्य म्हणून बैठकीत पद ग्रहण केले. अझाली असौमनी युनियन ऑफ कोमोरोस या देशाचे अध्यक्ष आहेत.
जगाच्या दक्षिण गोलार्धातील विकसनशील देशांच्या (ग्लोबल साऊथ) समस्यांना प्राधान्य देणे, हे या भारताच्या जी-२० अध्यक्षतेदरम्यानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सबका साथ या भावनेला अनुसरून भारताने आफ्रिकन युनियनला जी-२० चे कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावे, असा प्रस्ताव मांडला होता. जूनमध्ये मोदींनी पुढाकार घेऊन जी-२० सदस्य देशांच्या नेत्यांना पत्र लिहून नवी दिल्ली शिखर परिषदेदरम्यान एयूला पूर्ण सदस्यत्व देण्याचे आवाहन केले होते.
काही आठवड्यांनंतर हा प्रस्ताव शिखर परिषदेसाठी अधिकृत मसुद्यात पोहोचला. जुलैमध्ये कर्नाटकातील हम्पी येथे बोलावलेल्या तिसऱ्या जी-२० शेर्पा बैठकीत या विषयाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर सर्व सदस्य देशांनी हा प्रस्ताव स्वीकारत आफ्रिकन युनियनला जी-२० चे कायम सदस्यत्व बहाल केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आफ्रिका खंडातील समस्या, अडचणी आणि आकांक्षा अधोरेखित करून या देशांना जागतिक स्तरावर आवाज मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या या प्रयत्नांना नवी दिल्लीतील बैठकीत यश आल्याचे दिसून आले.