मेरा भारत, मेरा परिवार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लालूप्रसादांवर पलटवार
आदिलाबाद (तेलंगण) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:चा परिवार नाही, अशी टीका राजदचे नेते लालूप्रसाद यादव रविवारी केली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जोरदार हल्ला चढविला. देशातील १४० कोटी जनता हाच आपला परिवार आहे, ‘मेरा भारत, मेरा परिवार’, असे मोदी यांनी यावेळी जाहीर केले. इतकेच नव्हे, तर घराणेशाही असलेल्या पक्षांवरही त्यांनी टीका केली. घराणेशाहीत चेहरे वेगवेगळे आहेत, मात्र ‘झूठ आणि लूट’ हे एकच स्वभाववैशिष्ट्य आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांचा स्वतःचा परिवार नाही त्याला आम्ही काय करणार, ते राम मंदिराच्या बढाया मारतात, मात्र ते स्वत: खरे हिंदूच नाहीत, पालकांचे निधन झाल्यानंतर केस कापण्याची हिंदूंची प्रथा आहे, मोदी यांच्या मातोश्रींचे निधन झाले तेव्हा त्यांनी ही प्रथा पाळली नाही, असे वक्तव्य लालूप्रसाद यांनी रविवारी पाटणा येथील सभेत केले होते.
देशातील जनतेची सेवा करणे यालाच आपले प्राधान्य आहे आणि त्यासाठीच अगदी तरुण वयात जनसेवेचे स्वप्न घेऊन आपण घर सोडले, जनकल्याणासाठी आपण स्वत:ला सेवक म्हणून समर्पित केले आहे, असे मोदी म्हणाले. ‘मेरा भारत मेरा परिवार है’, आपले जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे, देशातील जनतेला त्याची जाण आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’चा जप
नरेंद्र मोदी यांना स्वतःचा परिवार नाही, अशी टीका राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी करताच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप आता सरसावला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रविशंकर प्रसाद इतकेच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमांवर आपल्या खात्यावर स्वतःच्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे कंसामध्ये लिहिले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’, अशी टीका केली होती. त्यालाही भाजपच्या नेत्यांनी ‘मै भी चौकीदार’ असे प्रत्युत्तर दिले होते.
तेलंगणमध्ये ५६ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणमधील विविध विकासकामांची पायाभरणी केली आणि काही प्रकल्प देशाला समर्पित केले. यामध्ये ५६ हजार कोटी रुपयांच्या ऊर्जा, रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. आपल्या भाषणात मोदी यांनी भारताचा आर्थिक विकास अधोरेखित केला. मोदी यांच्या या अधिकृत कायर्क्रमाला राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन आणि मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनीही हजेरी लावली होती. दीर्घकाळानंतर तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अनेकदा मोदी यांच्या कार्यक्रमांना दांडी मारली होती. मोदी यांनी पेडापल्ली येथील एनटीपीसीचा ८०० मेगावॅट (युनिट-२) तेलंगण सुपर अैष्णिक ऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केला. भारताच्या वृद्धिदराची गेल्या तीन-चार दिवसांपासून जगभर चर्चा सुरू आहे. या वेगाने भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.