सुवेंदू अधिकारी यांना संदेशखळीला भेट देण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही परवानगी दिली.
सुवेंदू अधिकारी यांना संदेशखळीला 
भेट देण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी अशांत संदेशखळीला भेट देण्याची परवानगी दिली आहे. तर संदेशखळी येथे महिलांवरील लैंगिक अत्याचार व जमीन हडप करण्याच्या प्रकरणी प्रमुख आरोपी व तृणमूल काँग्रेस नेता शहाजहान शेख याला अजून पोलिसांनी अटक केलेली नसल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही परवानगी दिली. अधिकारी यांच्याबरोबरच भाजपचे दुसरे आमदार शंकर घोष यांनाही संदेशसाखळीला भेट देण्याची परवानगी देणाऱया एकल खंडपीठाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. खंडपीठाने त्या अनुषंगाने सांगितले की, ज्या व्यक्तीला या समस्येचे मूळ आहे असे म्हटले जाते, त्याला अजूनही पकडता येत नाही आणि तो कायद्याचा अवमान करत पळून जात आहे, हे आश्चर्यकारक आहे. शेख ५ जानेवारीपासून फरार आहे, जेव्हा ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाने हल्ला केला होता.

वृंदा करात यांना रोखले

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांना मंगळवारी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखले. संदेशखळीमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे तेथील शांतता भंग होईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला सांगितल्याचे करात यांनी सांगितले. संदेशखळीला जाताना सीपीआय(एम) नेत्याला धमाखली फेरी घाटावर थांबवण्यात आले. करात यांनी धमाखली येथे पत्रकारांना सांगितले की, महिलांना स्थानिक तृणमूल कार्यालयात बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले तेव्हा शांततेचा भंग झाला. आता ही न्यायाची लढाई आहे. आपणाला व इतर काही माकप महिला नेत्या लैंगिक अत्याचाराच्या कथित पीडितांना भेटू इच्छित होत्या. आम्हाला संदेशखळी येथे जाण्यापासून रोखणे चुकीचे असून आम्ही या कारवाईचा निषेध करतो, असे त्या म्हणाल्या.

सुवेंदू अधिकारी यांना पोलिसांनी रोखले...

पश्चिम बंगालचे वरिष्ठ भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील अशांत संदेशखळीला भेट देण्यापासून रोखण्यासाठी धमाखली येथे नियुक्त जसप्रीत सिंग या शीख आयपीएस अधिकाऱ्यास भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांच्यावर 'खलिस्तानी' असे टोमणे मारल्याने खळबळ उडाली.

शीख अधिकाऱ्याला भाजप कायर्कर्त्यांच्या गटाने खलिस्तानी म्हटल्याचा दावा अधिकारी यांच्यासोबत असलेले भाजप आमदार अग्निमित्र पॉल यांनी दावा केला की पोलीस अधिकारी त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत आणि भाजप समर्थकांनी त्यांना 'खलिस्तानी' संबोधल्याचा आरोप फेटाळून लावला. या प्रकाराबद्दल तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे तसेच भाजपचे हे जातीय राजकारण असल्या संबंधात या प्रकाराची व्हिडिओ क्लीपही प्रसारित केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in