चीनकडून निवडणूक गैरप्रकारांची शक्यता; मायक्रोसॉफ्टचा इशारा

मायक्रोसॉफ्ट थ्रेट ॲनालिसिस सेंटरने (एमटीएसी) पूर्व आशियासाठी नजीकच्या भविष्यकाळात असलेल्या धोक्यांचे विश्लेषण करणारा एक अहवाल (मायक्रोसॉफ्ट थ्रेट इंटेलिजन्स इनसाइट्स रिपोर्ट) नुकताच सादर केला.
चीनकडून निवडणूक गैरप्रकारांची शक्यता; मायक्रोसॉफ्टचा इशारा

न्यूयॉर्क : भारत, अमेरिका आणि दक्षिण कोरियात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत चीन कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार आणि हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. समाज माध्यमांवर द्वेषमूलक आणि सामाजिक तेढ पसरवणारा मजकूर पसरवून चीन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे मायक्रोसॉफ्टच्या अहवालात म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्ट थ्रेट ॲनालिसिस सेंटरने (एमटीएसी) पूर्व आशियासाठी नजीकच्या भविष्यकाळात असलेल्या धोक्यांचे विश्लेषण करणारा एक अहवाल (मायक्रोसॉफ्ट थ्रेट इंटेलिजन्स इनसाइट्स रिपोर्ट) नुकताच सादर केला. या सेंटरचे जनरल मॅनेजर क्लिंट वॅट्स यांनी त्याबद्दल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चीन आणि उत्तर कोरिया हे देश कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा जगभरच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील.

यंदा जगात अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्यात भारत, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारतात १९ एप्रिल ते ४ जूनपर्यंत लोकसभा निवडणुका होणार आहेत. अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे, तर दक्षिण कोरियात १० एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जाहीर सभा, नेत्यांची भाषणे आदी माध्यमांतून निवडणुकीचा प्रचार अद्याप होत असला, तरी इंटरनेटच्या प्रसारानंतर समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. राजकीय पक्ष आणि नेते त्याचा सध्या त्याचा पुरेपूर वापर करताना दिसतात. आता त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचीही भर पडली आहे. चीन या तंत्रज्ञानाचा वापर करून समाज माध्यमांवर पसरवण्यासाठी मजकूर तयार करू शकतो.

त्यात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम पोस्ट्स, मीम्स, रिल्स आदीचा समावेश होऊ शकतो. विविध देशांच्या समाजांमध्ये असलेल्या वादाच्या मुद्द्यांचा वापर करून चीन त्याला खतपाणी घालणाऱ्या पोस्ट्स तयार करू शकतो. त्याने प्रत्यक्ष निवडणुकांच्या निकालांवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी असली तरी मतदारांच्या मानसिकतेवर जरूर परिणाम होऊ शकतो. त्या माध्यमातून चीन अन्य देशांच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in