चंदिगड : गेली सहा दशके भारतीय हवाई दलात पराक्रम गाजवणारे आणि शत्रूला पाणी पाजणारे ‘मिग-२१’ हे विमान शुक्रवारी निवृत्त झाले. भारतीय हवाई दलाचा अनेक वर्षांपासून आधारस्तंभ असलेले मिग-२१ हे लढाऊ विमान शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाले आहे. भारताचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान असलेल्या 'मिग-२१' ने १९६५, १९७१ आणि कारगिलच्या १९९९ च्या युद्धात पाकिस्तानच्या सैनिकांना अक्षरशः धडकी भरवली होती.
आपल्या कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातही या 'फ्लाइंग मशीन'ने पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाचा वेध घेऊन आपला दबदबा सिद्ध केला होता. चंदिगड येथे आयोजित एका विशेष समारंभात मिग-२१ ला अखेरची मानवंदना देण्यात आली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या सेवामुक्ती समारंभात विशेष उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला सीडीएस जनरल अनिल चौहान, सीओएएस जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सीएनएस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे देखील उपस्थित होते.
विंग कमांडर (निवृत्त) राजीव बत्तीश यांनी मिग-२१ बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. "मिग-२१ चा प्रवास खूप मोठा आणि ऐतिहासिक आहे. या विमानाला निरोप देण्यासाठी इतके लोक जमले आहेत, हेच या विमानाचे महत्त्व सिद्ध करते, असे ते म्हणाले. भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक वैमानिकांनी उडवलेले लढाऊ विमान म्हणजे मिग-२१ आहे. हे अत्यंत शक्तिशाली विमान होते, असेही ते म्हणाले.
शक्तिशाली 'मिग २१'ची वैशिष्ट्ये
मिग-२१ हे लहान डिझाइनचे पण अत्यंत शक्तिशाली विमान म्हणून ओळखले जात होते, जे जलद हल्ला आणि हवाई युद्धासाठी महत्त्वपूर्ण मानले गेले. मिग-२१चा कमाल वेग सुमारे २,२०० किलोमीटर प्रतितास इतका होता. हे विमान १७,५०० मीटरपर्यंतच्या उंचीवर उड्डाण करू शकत होते. यात हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जात होती. अनेक दशके भारताच्या हवाई संरक्षणाची धुरा वाहिलेल्या या 'हिरो' विमानाला आज सन्मानाने निरोप देण्यात आला.