

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री एका अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण साखळी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतांमध्ये चार लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात बुधवारी रात्री ८:३० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-१३५ वर ड्रमंडगंज घाटातून लासोडाच्या दिशेने उतरताना घडला. मध्य प्रदेशातून हरभरा घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक घाटात अचानक निकामी झाले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या या ट्रकने समोर असलेल्या एका बोलेरो गाडीला आणि दुसऱ्या एका ट्रकला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेनंतर बोलेरोसह दोन कारनी पेट घेतला. आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला दोन तासांहून अधिक काळ लागला. मिर्झापूरच्या पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी ढिगाऱ्यातून आणि जळालेल्या गाड्यांतून मृतदेह बाहेर काढले. मध्य प्रदेशातील मैहर देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मिर्झापूरमधील एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात ८ ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, मिर्झापूरमधील रस्ते अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, मृतांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तपास सुरू
जिल्हाधिकारी पवन गंगवार यांनी सांगितले की, मृतांच्या नातेवाईकांना वाहनांच्या नोंदणी क्रमांकावरून शोधून काढण्यात आले आहे. मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले असल्याने ओळख पटवण्यात अडचणी आल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला असून घाटातील तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा शोध घेतला जात आहे.