माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला !उदयनिधी यांची ४ दिवसांनंतर सारवासारव

मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना सनातन वादावर सडेतोड उत्तर देण्याचे सांगितले होते
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला !उदयनिधी यांची ४ दिवसांनंतर सारवासारव

चेन्नर्इ : चहूबाजूंनी टीकेचे धनी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरील आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना आपण कोणत्याही धर्माचे शत्रू नाही, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असे म्हटले आहे. तब्बल चार दिवसांनंतर त्यांनी ही सारवासारवीची भूमिका व्यक्त केली आहे. त्याआधी ते सनातन धर्माबाबत आक्रमकच होते. आता मात्र चार पानी निवेदन सादर करून सारवासारव केली आहे.

आपल्या निवेदनात उदयनिधी यांनी पाच मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात मोदी आणि कंपनी लक्ष विचलित करण्यासाठी जुन्या युक्त्या वापरत आहेत. भारतातील मणिपूरच्या प्रश्नांना तोंड देण्यास मोदी घाबरले आहेत आणि आपला मित्र अदानीसोबत जगभर फिरत आहेत. जनतेचे अज्ञान हेच ​​त्यांच्या नाट्यमय राजकारणाचे भांडवल आहे हेच खरे. गेली ९ वर्षे भाजपची सर्व आश्वासने पोकळ राहिली. फॅसिस्ट भाजप सरकारच्या विरोधात सध्या संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे, आमच्या कल्याणासाठी खरोखर काय केले आहे, असा प्रश्न आता जनता विचारात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री फेक न्यूजच्या आधारे माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. मी पण अध्यात्मवादी आहे. कोणत्याही धर्माने जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली तर त्या धर्मात अस्पृश्यता आणि गुलामगिरी दिसली, तर त्या धर्माला विरोध करणारा मी पहिला माणूस असेन, असे उदयनिधी यांनी आपल्या चार पानी निवेदनात म्हटले आहे.

याचप्रमाणे उदयनिधींचे वडील एम. के. स्टॅलिन यांनी देखील आता मुलाचा बचाव केला. स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर एक विधान पोस्ट केले - भाजपने खोटे पसरवले आहे. पंतप्रधानांनीही सत्य जाणून न घेता यावर भाष्य केले, असे एम. के. स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना सनातन वादावर सडेतोड उत्तर देण्याचे सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in