बंगळुरू : गतवर्षी चांद्रमोहिमेत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारताने सौरमोहीमदेखील फत्ते करून दाखवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित केलेले 'आदित्य एल-१' यान १२५ दिवसांत १५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी अंतराळातील 'लाग्रान्ज-१' या बिंदूजवळ पोहोचले. 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी यानाला 'लाग्रान्ज-१' बिंदूभोवतालच्या 'हॅलो' कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करून इतिहास रचला. अशा प्रकारची भारताने अंतराळात पाठवलेली ही पहिलीच सौर वेधशाळा आहे. 'आदित्य एल-१' यानाद्वारे केल्या जाणाऱ्या निरीक्षणांचा सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी मोठा लाभ होणार आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समस्त देशातून 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इस्रोने २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-५७ प्रक्षेपकावरून आदित्य एल-१चे प्रक्षेपण केले होते. प्रक्षेपणानंतर ६३ मिनिटं आणि २० सेकंदांनी आदित्य एल-१ यानाला पृथ्वीभोवताली कमीत कमी २३५ किमी आणि अधिकतम १९,५०० किमी अंतरावरील कक्षेत पाठवण्यात आले. त्यानंतर इस्रोने हळूहळू आदित्य एल-१ यानाला सूर्याच्या दिशेने पाठवण्यास सुरुवात केली. आदित्य एल-१ यानाने १२५ दिवसांत १५ लाख किमी अंतर पार केल. हे अंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील एकूण अंतराच्या केवळ एक टक्का आहे. या अंतरावर अंतराळात लाग्रान्ज-१ नावाचा बिंदू आहे. त्याभोवतालच्या हॅलो कक्षेत राहून आदित्य एल-१ सूर्याची निरीक्षणे करणार आहे. सूर्याचे वातावरण, किरणे, तेथून बाहेर पडणारे विद्युतभारीत कण, सूर्याच्या पृष्ठभागावरील होणारी वादळे आदी बाबींचा हे यान अभ्यास करेल. त्यासाठी आदित्य एल-१ यानावर विविध प्रकारची सात शास्त्रीय उपकरणे बसवली आहेत.
लाग्रान्ज बिंदू आणि हॅलो ऑर्बिट
सूर्य आणि पृथ्वीच्या संदर्भात अंतराळात पाच लाग्रान्ज बिंदू आहेत. तेथे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण आणि अपकेंद्र बल (सेंट्रिपेटल फोर्स) यांच्यात एका प्रकारच्या समन्वयाची अवस्था असते. तेथे उपग्रह कमीत कमी इंधन वापरून जवळपास पार्किंग केल्यासारखा राहू शकतो. त्यामुळे कमीत कमी ऊर्जेत यान तेथे राहून सूर्याची निरीक्षणे करू शकते. या बिंदूभोवतालच्या हॅलो कक्षेत (ऑर्बिट) आदित्य एल-१ यानाला स्थापित करण्यात आले आहे. हॅलो कक्षेतील उपग्रह सतत सूर्याच्या दिशेने आपला रोख ठेवून फिरत असतात. हॅलो कक्षेत स्थापित केलेल्या उपग्रहांच्या आणि सूर्याच्या मध्ये अन्य ग्रह, तारे येत नाहीत किंवा त्या रेषेत ग्रहणे लागत नाहीत. त्यामुळे अशा उपग्रहांद्वारे सूर्याची विनाअडथळा निरीक्षणे करता येतात, हा हॅलो कक्षेचा फायदा आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतुक
सौरमोहिमेच्या यशानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले की, 'आदित्य एल-१ यानाला अंतराळातील लाग्रान्ज-१ बिंदूभोवतालच्या अपेक्षित कक्षेत स्थापित करून भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या घवघवीत यशाबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन. या मोहिमेतून आपली पृथ्वी आणि सूर्याबद्दलची समज वाढण्यास मदत होईल. त्यातून समस्त मानवजातीचे हित साधले जाईल. या मोहिमेत महिला शास्त्रज्ञांचे योगदानही मोठे असून त्याद्वारे महिला सबलीकरणानेही अधिक उंची गाठली आहे.
मोदी यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले की, 'भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भारताच्या आदित्य एल-१ या पहिल्या सौर वेधशाळेने अपेक्षित स्थळापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. अंतराळातील अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या मोहिमा यशस्वी करण्यातील भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांचा हा पुरावा आहे. मी देशवासीयांसह या अभूतपूर्व यशाचा गौरव करत आहे. मानवजातीच्या हितासाठी विज्ञानाची नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्याचा क्रम आम्ही सुरूच ठेवू.’