ममता बॅनर्जींना झटका; तपस रॉय यांनी पक्ष सोडला; आमदारकीचाही राजीनामा

ममता बॅनर्जींना झटका; तपस रॉय यांनी पक्ष सोडला; आमदारकीचाही राजीनामा

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तपस रॉय यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत केली आणि पक्ष सोडल्याचे जाहीर केले.
Published on

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तपस रॉय यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत केली आणि पक्ष सोडल्याचे जाहीर केले. पश्चिम बंगाल विधानसभेच्या आमदारकीचाही त्यांनी राजीनामा दिला. संदेशखळी प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले, ते योग्य नव्हते असे त्यांनी म्हटले आहे.

तपस रॉय हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्य विधानसभेतील डेप्युटी चीफ व्हिप होते. जानेवारीमध्ये त्यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. तेव्हा पक्षनेतृत्व त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही, असा आरोप रॉय यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीने मी खरोखर निराश झालो आहे. पक्ष आणि सरकारवर भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांमुळे मी कंटाळलो आहे. दुसरे म्हणजे संदेशखळीचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला गेला त्याला मी समर्थन देत नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष आणि ब्रात्या बसू यांनी सोमवारी सकाळी रॉय यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. रॉय यांचे उत्तर कोलकाता मतदारसंघातील तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांच्याशी मतभेद आहेत. तेव्हा रॉय म्हणाले की, मी गेली २५ वर्षे पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे. पण मला त्याचे फळ मिळाले नाही.

logo
marathi.freepressjournal.in