भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. भाजपच्या तिसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवपुरी मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिलेल्या शिंदेंच्या आत्या यशोधरा राजे या प्रकृतीच्या कारणामुळे यंदा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी ज्योतिरादित्य यांना निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ शकते.
निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येते. परंतु सध्या मध्य प्रदेशमध्ये खासदार, केंद्रीय मंत्री अशा बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवल्याचे चिन्ह पाहायला मिळत आहे. तिकीट मिळाले की नाराजी, असा वेगळाच पॅटर्न सध्या मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे. याच मालिकेत आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची देखील भर पडली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा राजे या शिवराज सिंह यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, पण प्रकृतीच्या कारणामुळे त्या यंदा निवडणूक लढणार नाहीत, असे त्यांनी स्वत: जाहीर केले आहे. ज्या भागामध्ये भाजपला सर्वाधिक आव्हान आहे, त्या ग्वाल्हेर-चंबळ भागामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या घराण्याचे वर्चस्व आहे.
यशोधरा राजे यंदाच्या निवडणुकीत उतरणार नसतील तर त्यांच्या जागी शिंदे कुटुंबातून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत उत्सुकता आहे. कृषी मंत्री नरेश तोमर यांच्यासह इतर तीन केंद्रीय मंत्री भाजपने निवडणुकीसाठी उतरवले आहेत. याच पद्धतीने आता ज्योतिरादित्य शिंदे यांना उतरवले जाणार का? तिसऱ्या यादीत त्यांचे नाव असणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सात खासदारांना ज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश त्या सगळ्यांना विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नरेश तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांना भाजपने विधानसभेत लढायला सांगितले आहे. सोबत भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही बऱ्याच वर्षांनंतर निवडणुकीत उतरायला सांगितले आहे.