शिंदे गटातील आमदार केंद्रीय आयोगासमोर ओळख परेड करणार

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे.
शिंदे गटातील आमदार केंद्रीय आयोगासमोर ओळख परेड करणार

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गटातील संघर्ष आता वेगळ्या टप्प्यावर पोहोचला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचे सांगणार आहेत.

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊन शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत.

हे सगळे आमदार आम्ही स्वमर्जीने एकनाथ शिंदेंसोबत आहोत, अशाप्रकारचे शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करू शकतात. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे असतील तर ते याबाबत ते विचारू शकतात. याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बंड केले. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले, यानंतर राज्यातले महाविकास आघाडी सरकार कोसळले. सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी घटनापीठाचीही स्थापना केली आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची ओळख परेड करण्याची रणनीती आखली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in