गुजरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये नमाज पढणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर हल्ला; दोघांना अटक; तपासासाठी पोलिसांची ९ पथके

गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या परदेशांतील विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून २० ते २५ जणांविरुद्ध एफआयआर
गुजरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये नमाज पढणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर हल्ला; दोघांना अटक; तपासासाठी पोलिसांची ९ पथके

अहमदाबाद : गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या परदेशांतील विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून २० ते २५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. हितेश मेवाडा आणि भरत पटेल अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दंगल, बेकायदेशीरपणे एकत्र येणे, स्वेच्छेने दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि गुन्हेगारी घुसखोरी करणे, असे गुन्हे नोंदवले आहेत.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी नऊ पथके तयार केली आहेत. शनिवारी रात्री ए-ब्लॉक वसतिगृहात घडलेल्या या घटनेत जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एक विद्यार्थी श्रीलंकेचा आणि दुसरा ताजिकिस्तानचा आहे.

गुजरात विद्यापीठात अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, श्रीलंका आणि आफ्रिकेतील देशांसह सुमारे ३०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकत आहेत. विद्यापीठाच्या ए-ब्लॉक वसतिगृहात जवळपास ७५ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी राहतात. शनिवारी रात्री १०.५० च्या सुमारास २० ते २५ जण गुजरात विद्यापीठाच्या ए-ब्लॉक वसतिगृहात घुसले आणि त्यांनी वसतिगृहातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी नमाज अदा करण्यावर आक्षेप घेतला. त्यांनी या मुद्द्यावरून वाद घातला. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि दगडफेक केली. तसेच त्यांच्या खोल्यांची तोडफोडही केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीलंकेच्या आणि ताजिकिस्तानच्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे कथित व्हिडीओदेखील उघड झाले आहेत. त्यात लोक दगडफेक करताना दिसत आहेत आणि एका घटनेत एक माणूस विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याला थप्पड मारताना दिसत आहे. पोलीस या व्हिडीओंची सत्यता पडताळत आहेत.

गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू नीरजा गुप्ता यांनी सांगितले की, ए-ब्लॉक वसतिगृहाच्या आवारात दोन गटांमध्ये चकमक झाली. हे प्रकरण चिघळले आणि काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दुखापत झाली. यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सरकारने आणि पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि तपास सुरू आहे. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

परराष्ट्र खात्याकडून खुलासा

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी भारताच्या परराष्ट्र खात्याने खुलासा केला आहे. परराष्ट्र खात्याने प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, या घटनेत श्रीलंका आणि ताजिकीस्तानचा प्रत्येकी एक विद्यार्थी जखमी झाला. त्यातील एकाला रुग्णालयात उपचार केल्यानंतर परत पाठवण्यात आले, तर दुसऱ्यावर उपचार होत आहेत. गुजरात सरकार हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in