शिलाँग : मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यामध्ये दोन व्यक्तिंना जमावानं जीव जाईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. रिपोर्टनुसार या दोघांनीही एका १८ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. शुक्रवार दुपारी जिल्हा मुख्यालय असलेल्या मैरांगमधील नोंगथ्लिव गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. संबंधित मुलीनं आरोप केला आहे की, ती घरी एकटी असताना दोन व्यक्तिंनी तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील लोक जमा आले आणि या जमावानं दोघांनाही पकडलं.
नेमकं काय घडलं?
जमावानं त्यांना एका सार्वजनिक हॉलमध्ये नेलं आणि बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते वाचू शकले नाहीत. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, लोक तिथून गेल्यावर दोघांनाही तिथून बाहेर काढण्यात आलं. परंतु दोघांपैकी एकाचा मृत्यू तिरोट सिंग मेमोरियल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर दुसऱ्याचा मृत्यू शिलाँग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. सदर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी सांगितलं की दोन्ही मृत व्यक्ती राज्यातील रहिवासी होते. नोंगथ्लिवमध्ये ते मजूर म्हणून काम करायचे.