इम्फाळ : मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला वांशिक हिंसाचार भडकल्याने बंद करण्यात आलेल्या मोबाईल, इंटरनेट सेवा शनिवारपासून चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर पूर्ववत करण्यात आल्या. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सकाळी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर काही तासांनी सेवा पुन्हा सुरू झाल्या.
येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिंह म्हणाले, खोट्या बातम्या, अपप्रचार आणि द्वेषपूर्ण भाषणांचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने ३ मे रोजी मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित केली होती. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत केली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रश्नावर काम करत राहील. तसेच त्यांनी भारत-म्यानमार सीमेवर पूर्ण कुंपण घालण्याच्या गरजेवर भर दिला. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर ६० किमी कुंपण घालण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती सुधारली आहे आणि असुरक्षित भागात सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे गोळीबाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, असेही ते म्हणाले.