मेलबर्न : आजकाल लहान मुलांना मोबाइल आणि टीव्हीचे इतके व्यसन लागले आहे की, त्यांना जेवणखाण, अभ्यास, खेळ अशी कामे करायला लावणे पालकांसाठी मोठे मुश्किलीचे बनत चालले आहे. मुलांकडून मोबाइल काढून घेतला किंवा त्यांचा आवडता कार्टून शो सुरू असताना टीव्ही बंद केला तर त्यांचे रडणे आणि आकांडतांडव करणे ठरलेले असते. त्याला वैतागून अनेक पालक हतबलपणे मुलांचे हट्ट निमूटपणे पुरवताना दिसतात. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी या समस्येवर संशोधन केले असून काही उपयुक्त निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे मुलांचा स्क्रीन-टाइम कमी करणे शक्य होणार आहे.
एखादी क्रिकेट मॅच रंगात आली असताना कोणी अचानक टीव्हीचे चॅनेल बदलले किंवा आवडती मालिका सुरू असताना टीव्ही बंद केला तर प्रौढ पुरुष किंवा स्त्रियांना जसा राग येतो त्याचप्रमाणे लहान मुलांचीही त्यांचे आवडते कार्टून पाहताना व्यत्यत आणल्यास चिडचिड होते. मुलांकडून मोबाइल काढून घेतल्यास त्यांनी आकांडतांडव किंवा थयथयाट करणे, ही आजकाल घरोघरी नित्याची बाब बनली आहे. त्यामुळे पालक हैराण झालेले दिसतात. मुलांना यापासून कसे परावृत्त करायचे, हे पालकांना समजत नाही.
नेमकी हीच गरज ओळखून ऑस्ट्रेलियातील काही विद्यापीठांनी संशोधन केले. रोजच्या आयुष्यात मुलांना अनेक वेळा एक काम संपवून दुसरे सुरू करायचे असते. सकाळी झोपेतून उठून अंघोळ वगैरे आटोपणे, नाष्टा संपवून शाळेचे कपडे घालणे, त्यानंतर स्कूलबस पकडणे, खेळ संपवून अभ्यासाला बसणे, अशी अनेक कामे करताना स्थित्यंतर घडत असते. ठरावीक वेळानंतर एखादे काम संपवून दुसरे सुरू करणे, ही बाब आपण वय वाढेल तसे हळूहळू शिकत असतो. पण, मोबाइल किंवा टीव्हीचा पडदा सोडून अन्य कामे करताना मुलांना बरेच प्रयास पडतात. हे स्थित्यंतर टेक्नोलॉजी ट्रान्झिशन म्हणून ओळखले जाते. तर ते करताना मुले जे आकांडतांडव करतात त्याला टेक-टँट्रम्स म्हणतात. कामातील हा बदल सुकर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत.
हे उपाय करा
मोठ्यांप्रमाणेच मुलांनाही त्यांचे आवडते काम अचानक थांबवलेले आवडत नाही. त्यामुळे मुलांना मोबाइल किंवा टीव्हीचा वापर थांबवण्यापूर्वी त्याची पूर्वकल्पना द्यावी. मोबाइलवरील एखादा गेम किंवा टीव्हीवरील कार्टून पाहणे केव्हा संपवायचे आहे, यासाठी मुलांच्या मनाची तयारी करून घ्यावी. मोबाइल गेम संपल्यावर कोणते काम करायचे, तेही मुलांना सांगावे. त्यामुळे मोबाइलचा वापर थांबवण्यासाठी मुलांच्या मनाची तयारी करण्यास मदत होते. मोबाइल किंवा टीव्हीवरील आभासी जगापेक्षा मुलांना प्रत्यक्ष मैदानी खेळ किंवा घराबाहेरील कामांमध्ये गुंतवावे. समजा, मुले फायरमन सॅम नावाची टेलिव्हिजन मालिका पाहत असतील तर ती संपल्यावर त्यांना प्रत्यक्ष अग्निशमन दलाचे केंद्र दाखवावे, तेथील कामकाज समजावून सांगावे. या उपायांचा वापर करून मुलांची टेक्नोलॉजी ट्रान्झिशन सुकर करता येईल आणि टेक-टँट्रम्स थांबवता येतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.