
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आता पुन्हा एकदा गुरुवारी सायंकाळी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे.
या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले जाणार आहेत. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त
केले. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी ठार झाले. त्या ऑपरेशनदरम्यान देशभरात मॉक ड्रिल राबविण्यात आले होते.
दहशतवादी तळांची यादी
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. भारताने आतापर्यंत फक्त नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील आणखी १२ दहशतवादी तळांची यादी भारताकडे आहे. यापूर्वीच भारताने स्पष्ट केले होते की, दहशतवाद्यांचे उर्वरित तळही नष्ट केले जातील, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारत यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताच्या सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणाही सतर्क आहेत. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून भारतीय सैन्याने काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्रे स्थापन केली आहेत. आता अशातच सीमावर्ती भागात मॉक ड्रिल आयोजित केल्यामुळे पाकिस्तानही धास्तावला आहे.