मोठी बातमी: पूनम पांडेने ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; टीमने जारी केले निवेदन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक धक्कादायक बातमी
मोठी बातमी: पूनम पांडेने ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; टीमने जारी केले निवेदन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पूनम पांडे हिचे निधन झाले आहे. पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी (सर्वाइकल कॅन्सर) झुंज देत होती. ती ३२ वर्षांची होती. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती तिच्या टीमने दिली. अचानक पूनमच्या मृत्यूचे वृत्त आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पूनमचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. तिने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती तिच्या मूळ गावी कानपूरमध्ये होती, असे पूनमच्या टीमने फ्री प्रेस जर्नलला सांगितले. तिच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार हे अद्याप समजू शकलेले नाही.

"आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे लाडक्या पूनमला गमावले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक जीवाला शुद्ध प्रेम आणि दयाळूपणा मिळाला" असे निवेदन शेअर करण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, तिच्या काही चाहत्यांनी यावर विश्वास ठेवण्यासच नकार दिला. एका चाहत्याने ही 'फेक' किंवा 'प्रँक' करण्यासाठी केलेली पोस्ट नाही ना अशीही विचारणा केली.

२०१३ मध्ये नशा या चित्रपटातून पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०११ चा क्रिकेट विश्वचषक भारतीय क्रिकेट संघ जिंकल्यास मी न्यूड होईल अशी घोषणा केल्यावर पूनम पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. तथापि, हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट होता आणि पालकांनी आक्षेप घेतल्यामुळे मी असे काही करण्याची योजना रद्द केल्याचे तिने म्हटले होते.

पूनम मालिनी अँड कंपनी, खतरों के खिलाडी आणि बिग बॉस सारख्या इतर चित्रपट आणि शोमध्ये देखील दिसली. अलीकडेच ती लॉकअप या शोमध्येही झळकली होती. तिच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, ती सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड आणि उत्तेजक सामग्रीमुळे चर्चेत असायची.

logo
marathi.freepressjournal.in