मोदींनी बदलला भारताविषयीचा दृष्टिकोन

भारताच्या जागतिक प्रतिमेला मोठ्या प्रमाणात उंचावले आहे आणि विश्वगुरू या भूमिकेतून, राष्ट्राची हरवलेली प्रतिष्ठा, गौरव आणि सन्मान परत मिळवून दिला
मोदींनी बदलला भारताविषयीचा दृष्टिकोन

राजकारणात सात दिवस एक मोठा कालावधी असू शकतो; मात्र कोणत्याही देशाच्या इतिहासात, आठ वर्षांचा काळ हा खूप कमी कालावधी असतो. इतक्या कमी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताच्या जागतिक प्रतिमेला मोठ्या प्रमाणात उंचावले आहे आणि विश्वगुरू या भूमिकेतून, राष्ट्राची हरवलेली प्रतिष्ठा, गौरव आणि सन्मान परत मिळवून दिला आहे. आता पंतप्रधान म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे नवव्या वर्षात प्रवेश करत आहोत, त्यावेळी भारत केवळ देशांतर्गतच नाही तर जागतिक पातळीवरही भारत प्रगती करणार आहे. भारताच्या या नियतीचा मार्ग, दृढनिश्चयाने निश्चित करण्यात आला आहे.

राष्ट्रहिताला पारंपरिक राजकारणाच्या वर ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘भारत प्रथम’ हे धोरण निश्चितपणे परदेशात भारताच्या उदयासाठी कारणीभूत ठरले आहे. भारताच्या कणखर शक्तीसह सुप्त सामर्थ्य जगासमोर आणण्यासाठीचे अत्यंत कुशल नियोजन, आणि त्याला तंत्रज्ञानातील भारताच्या तज्ज्ञतेची जगभर ओळख ठसवण्यासाठीच्या प्रयत्नांची जोड आणि त्याचा वापर यातून हे सुनिश्चित झाले आहे की, चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भारत एकही संधी सोडणार नाही. ह्याच संकल्पामुळे, भारताच्या ‘देश प्रथम’ धोरणात जीव ओतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा आणि या संस्कृतीला अत्यंत बेधडकपणे प्रोत्साहन देण्यामुळे या धोरणाला आणखी ताकद मिळाली आहे.

आधीच्या सरकारांनीही भारताचे हे सुप्त सामर्थ्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्या प्रयत्नांचा प्रभाव म्हणावा तेवढा पडला नाही. तो प्रभाव मर्यादित राहिला. पर्यटनाशी संबंधित पायाभूत व्यवस्था वाढवण्याकडे लक्ष न देता, पर्यटनाला चालना देणे, किंवा भारताचे बहुविध-बहुरंगी स्वरूप केवळ एखाद्या स्मारकापुरतेच मर्यादित ठेवणे किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, लोकप्रिय संस्कृतीच्या सर्वात तळगाळातील स्वरूपालाच भारताचा वारसा म्हणून जगासमोर सादर करणे, या सर्व चुकांमुळे, सुप्त सामर्थ्याच्या क्षेत्रात, भारताचा उदय होऊ देण्याची संधी आपण गमावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, या दृष्टिकोनात व्यापक बदल केला आहे आणि त्यात पूरक तत्त्वे जोडली आहेत. उदारणार्थ, ह्या प्राचीन भूमीने जगाला दिलेली एक अप्रतिम भेट म्हणून योगशास्त्र आता जगभरात नावारूपाला आले आहे. संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर करत, भारताच्या या वेगळ्या सांस्कृतिक वारशाला लोकप्रिय करण्यासाठी स्वतः अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या ह्या उपक्रमासह योगशास्त्राला पाठिंबा देण्यासाठी विशेष धन्यवाद!

भूतकाळात, ‘वसुधैव कुटुंबकम’ ही केवळ एक घोषणा होती. एक नुसती रटाळ घोषणा, जिच्यामागे असणारा भक्कम नैतिक अर्थ कुठेतरी हरवून गेला होता. ‘विश्व हे एक कुटुंब आहे’ असे म्हणणे आणि भारताच्या संस्कृती आचरणात मुरलेल्या ह्या शाश्वत सत्याचा प्रत्यक्ष आयुष्यात अंगीकार करणे, ह्या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी हे आपल्या आचरणातून दाखवून दिले की, भारत केवळ आपल्या प्राचीन संतांच्या ज्ञानावर आणि प्राचीन ग्रंथांनी दिलेल्या शिकवणीवर विश्वासच ठेवत नाही, तर त्यानुसार प्रत्यक्ष आचरणही करतो. म्हणूनच, जेव्हा विकसित देश कोविड-१९ लसीबाबत दुसऱ्यांना मदत करण्यास उत्सुक नव्हते, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेजारी राष्ट्रांसह दूरवरच्या देशांनाही मदत करण्यासाठी आपले पाऊल पुढे टाकले.

अलीकडच्या काळात, अनेक दृष्टींनी ‘लसमैत्री’ हा भारताचा सर्वात उत्तम क्षण होता, जेव्हा आपण संपूर्ण जगाला दाखवले की, आम्ही एक राष्ट्र आणि संस्कृती म्हणून वेगळे आहोत. आम्ही विकसित जगांच्या या विचारांशी सहमत नाही की, ‘आपण प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या फायद्याचा विचार करावा.’

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ हे केवळ महामारीत मदत पोहोचवण्यापुरते मर्यादित नाही. जेव्हा नेपाळमध्ये भीषण भूकंप आला, तेव्हा तिथे संकटात मदत पाठवून नेपाळशी त्वरित संपर्क करणारा भारत पहिला देश होता. ज्यावेळी आज श्रीलंका संकटात आहे. तिथे अस्थिर परिस्थिती आहे, भारताने या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्वरित पाऊल उचलले आहे.

काबूलचे पतन आणि तालिबानचा उदय झाल्यावर जगाने अफगाणिस्तानकडे पाठ फिरवली. या महत्त्वाच्या घडामोडीमागे सुरक्षेविषयी पैलू असूनही, भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांना अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी भारतानेच अफगाणिस्तानला संसद भवनाची भेट दिली होती आणि अफगाणिस्तानातील सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या धरणांपैकी एक धरण बांधून दिले होते, याची आपल्याला कल्पना आहेच. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा उदात्त सिद्धान्त आपल्या जीवनाचा पाया आहे, ज्याप्रमाणे आपण जगाकडे बघतो आणि त्याच्याशी जोडले जातो, त्यात मूल्यांवर आधारित संबंध निर्माण करण्याची भारताची यादी तितकीच मोठी आहे, जितका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन व्यापक आहे. उदाहरणार्थ, आपल्या देशाच्या काही अपरिहार्यतेमुळे गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली, तरीदेखील भारताने हे पूर्ण स्पष्ट केले आहे की, ज्या देशांना गव्हाची गरज आहे, त्यांना त्यांच्या गरजेनुसार गव्हाचा पुरवठा केला जाईल. या निर्णयामागे एक अतिशय खोल नैतिक विचार हा आहे की, जर जग हे एक कुटुंब आहे, तर अन्न सुरक्षा एकट्या भारताची असू शकत नाही. जेव्हा जागतिक नेते तत्त्व आणि सिद्धान्त यावर फक्त बोलत असतात, तेव्हा पंतप्रधान मोदी मात्र ही तत्त्वे आणि सिद्धान्तांचे पालन करतात. हीच तत्त्वे जगासोबतच भारताच्या सर्वसमावेशी धोरणासाठी देखील मार्गदर्शन ठरतात. डिजिटल इंडिया’ची कहाणी तर इतकी चर्चेत आहे की, पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता आपण तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात जास्त स्टार्टअप असलेला देश आहोत आणि १०० युनिकॉर्न असल्याचा दावा करतो. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम यूपीआय पैकी एक आहे ज्यामुळे डिजिटल पेमेंट इतर देशांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय बनविले आहे. जगातील सर्वात मोठ्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन आणि देखरेख डिजिटल स्वरूपात करण्यात आली. डिजिटल समावेशनात पंतप्रधान मोदींचे ‘डिजिटल इंडिया’ धोरण मजबूत पाया बनून समोर आला आहे. इतर देशांच्या उलट, आम्ही तंत्रज्ञानाचा सामायिक वापर करण्यास इच्छुक आहोत. वातावरण बदलावर, भारताने अक्षय ऊर्जा, विशेषतः सौर ऊर्जा, सक्षम विकास आणि हरित गुंतवणुकीच्या वाटेवर नेतृत्व केले आहे, यामुळे ज्यांची असे करण्याची इच्छा नव्हती, त्यांच्यासाठी भारत दीपस्तंभाप्रमाणे काम करत आहे.

आपण हा जो अभूतपूर्व उत्साह बघत आहोत, कारण भारतीयांना खात्री आहे की, आपण हे करू शकतो. यामागे, ‘काहीही अशक्य नाही’ हा पंतप्रधान मोदी यांचाच विचार प्रेरक आहे, हे सर्वव्यापी आहे. आपले खेळाडू, ‘यंग इंडिया’चे उत्तम उदाहरण आहेत आणि ‘कॅन डू’ या मोदी मंत्राने ते प्रेरित आहेत, ते उत्तम कामगिरी करत आहेत, चषक जिंकत आहेत, ज्यांचे आपण केवळ स्वप्न बघू शकत होतो. भारत इतका विशाल देश आहे आणि या महान राष्ट्राबद्दल आजवर जगाला काय माहिती मिळाली आहे - याचे उदाहरण पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये आहे. कुठल्याच दोन भेटवस्तू एकसारख्या नसतात, कुठल्याच दोन भेटवस्तू एकाच ठिकाणाहून आणल्या जात नाहीत. प्रत्येक भेटवस्तू एकमेवाद्वितीय असते, प्रत्येक भेटवस्तू खऱ्या अर्थाने भारताच्या सुप्त शक्तीच्या महान पटाच्या एका लहानशा तुकड्याचे प्रतीक आहे. या भेटवस्तू देशाच्या उच्च सांस्कृतिक वारशाचा आणि महान उपलब्धींचा उत्सव साजरा करतात. भारत आज मंगळ आणि चंद्रावर मोहिमा काढू शकतो, भारत सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि विमानवाहू नौका तयार करू शकतो, भारत सर्वोत्तम रचनात्मक, सर्जनात्मक विचार निर्माण करू शकतो, भारत मूलभूत आराखड्यातील त्रुटी वेगाने दूर करू शकतो, भारत इतर देशांच्या तुलनेत एका महामारीचे उत्तम व्यवस्थापन करू शकतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला कुठल्याही इतर देशांच्या तुलनेत वेगाने पुन्हा पुढे नेऊ शकतो, भारत, दारिद्र्य आणि असमतोल प्रभावीपणे कमी करू शकतो, भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या रूपात उभा राहू शकतो. भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतो आहे, अशा वेळी, गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान मोदींनी येणाऱ्या अनेक दशकांसाठी कुठलाही अडथळा न येता भारताचा विकास व्हावा या दृष्टीने पायाभरणी केली आहे, असे मानले जाते. भारत आपल्या स्थानिक आघाड्यांवर समृद्ध होत राहील आणि जगात भारताचा मान वाढत राहील. एक प्राचीन संस्कृती म्हणून आजच्या जगात आपले योग्य ते स्थान मिळवीत आहे, भारताला विश्वगुरू म्हणून स्वीकारले जाईल. एक प्रेरणादायी आत्मविश्वासपूर्ण आणि आत्मनिर्भर राष्ट्र. पंतप्रधान मोदींनी खरोखरच आणि निःसंदेह भारताची नियती बदलली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in