
नवी दिल्ली : गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार असून ते ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) बैठकीतही सहभागी होणार आहेत. मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान आणि चीनचा दौरा करणार आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला युद्धविरामाबाबतचा दावा प्रथमच चीन दौऱ्यावर जाणार
आणि अडलेल्या व्यापार करारावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी यांच्या जपान दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. तर चीनच्या दौऱ्यामध्ये मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
मोदी हे ३० ऑगस्ट रोजी जपानच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तेथे ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील रणनीतिक, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याला आणखी पुढे नेण्याबाबत चर्चा होईल.
एससीओ बैठक
जपान दौरा आटोपल्यानंतर मोदी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनच्या तियानजिन शहरात आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होतील. सन २०१९ नंतरचा नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा असेल. ‘एससीओ’च्या बैठकीमध्ये प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद, व्यापारामधील सहकार्य आणि बहुपक्षीय सहकार्य यासारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
रशियाच्या प्रतिनिधीचीही परिषदेत उपस्थिती
रशिया हादेखील ‘एससीओ’ परिषदेचा सदस्य आहे. रशियाकडून त्यांचे प्रतिनिधी परिषदेसाठी पाठविण्यात येणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महत्त्वाचा दौरा
एकीकडे रशियाकडून खनिज तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे ‘ब्रिक्स’ देशांवर सातत्याने टीका करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा चीन दौरा होत आहे. ‘ब्रिक्स’ देश डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याचा दावा ट्रम्प करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा रणनीतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे.