'वंदे मातरम'वरून गोंधळ; काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले - मोदी

‘वंदे मातरम’ हा एक असा मंत्र होता त्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. मात्र, मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिना यांनी या मंत्राला विरोध दर्शविला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले आसन डळमळीत होत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे...
'वंदे मातरम'वरून गोंधळ; काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले - मोदी
'वंदे मातरम'वरून गोंधळ; काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले - मोदी
Published on

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ हा एक असा मंत्र होता त्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. मात्र, मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिना यांनी या मंत्राला विरोध दर्शविला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले आसन डळमळीत होत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले. लांगुलचालनाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटली आणि त्यामुळे भारताला फाळणीसारख्या दुर्दैवी निर्णलाला सामोरे जावे लागले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसवर हल्ला चढविला.

‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी लोकसभेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. मोदी यांनी सोमवारी आपल्या भाषणातून या चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले की, देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे. जगाच्या इतिहासात अशी कविता किंवा असे कोणतेही भावनिक गाणे असू शकत नाही, ज्याने शतकानुशतके लाखो लोकांना एकाच ध्येयासाठी प्रेरित केले.

चौकशी सुरू केली

मुस्लिम लीगच्या निराधार विधानांचा तीव्र निषेध करण्याऐवजी नेहरूंनी ‘वंदे मातरम’ची चौकशी सुरू केली, असा आरोप मोदी यांनी केला. ‘वंदे मातरम’ हा असा मंत्र होता ज्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली होती. त्याग आणि तपश्चर्या यांचा मार्ग दाखवला होता. अशा ‘वंदे मातरम’चे स्मरण करणे हे आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे, असे मोदी म्हणाले.

फाळणीचा दुर्दैवी निर्णय

१९३७ मध्ये मुस्लीम लीगने ‘वंदे मातरम’ला विरोध दर्शवला. मात्र, पंडित नेहरुंनी मुस्लीम लीगला खडे बोल सुनावले नाहीत. मोहम्मद अली जिना यांनी जेव्हा ‘वंदे मातरम’ला विरोध केला, तेव्हा पंडित नेहरुंना त्यांची खुर्ची डळमळीत होताना दिसली. ‘वंदे मातरम’ या गीतातील काही शब्दांवर मुस्लीम लीगचा आक्षेप होता. त्यानंतर काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लीम लीगच्या दबावात हा निर्णय घेतला, अशी टीका मोदींनी केली.

मोदी पुढे म्हणाले, लंडनच्या ‘इंडिया हाऊस’मध्ये वीर सावरकरांनी ‘वंदे मातरम’ गायले, या नावाने वृत्तपत्रे काढली गेली, ज्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. भिकाजी कामांनी पॅरिसमध्ये ‘वंदे मातरम’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या गीताने देशात स्वावलंबनाची भावना रुजवली. लहान मुलेही प्रभातफेरी काढत ‘वंदे मातरम’चा जयघोष करीत होती, त्यांना तुरुंगात डांबले जायचे, चाबकाचे फटके मारले जायचे. बंगालच्या गल्लींमधून उठलेला हा आवाज अखेर संपूर्ण देशाचा आवाज बनला.

‘वंदे मातरम’वर अन्याय झाला

‘वंदे मातरम’सोबत विश्वासघात का झाला? त्यावर अन्याय का झाला? कोणत्या शक्तीने ‘वंदे मातरम’सारख्या पवित्र गीताला वादांच्या भोवऱ्यात ढकलले? नवीन पिढीला हा इतिहास सांगितलाच पाहिजे. काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले. तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा हा त्यांचा मार्ग होता. त्यामुळेच काँग्रेसला भारताच्या फाळणीलाही बळी पडावे लागले. काँग्रेस ज्यांच्याशी संबंधित आहे, ते ‘वंदे मातरम’वरून तीव्र वाद निर्माण करतात. इतिहास साक्षी आहे की, काँग्रेस मुस्लीम लीगला शरण गेली, असा हल्लाही मोदी यांनी चढविला.

‘वंदे मातरम’ ब्रिटिशांना सडेतोड उत्तर होते, ही घोषणा आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते आवडले होते. त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होते. त्यांच्यासाठी या गीताची ताकद मोठी होती. मग गेल्या दशकांमध्ये यावर इतका अन्याय का झाला? ‘वंदे मातरम’सोबत विश्वासघात का झाला? ती कोणती शक्ती होती? ज्याची इच्छा पूज्य बापूंच्या भावनांवरही भारी पडली, असे पंतप्रधान म्हणाले.

विपर्यास करण्यात मोदी पटाईत - काँग्रेसची टीका

‘वंदे-मातरम’वरील चर्चेला मोदी राजकीय रंग देत असून ते इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानावर एखादाही कलंक लावू शकणार नाहीत, असेही काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसनेच ‘वंदे मातरम’ला महत्त्व आणि राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. कोणत्याही प्रश्नावर भाष्य करताना पंडित नेहरू आणि काँग्रेसचा संदर्भ देण्याची मोदी यांची सवयच आहे, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान मोदी यांनी नेहरू यांचे नाव १४ वेळा घेतले, तर काँग्रेसचे नाव ५० वेळा घेतले, असेही गोगोई म्हणाले. कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करण्यात मोदी वाकबगार आहेत, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in