नामरूप : काँग्रेस ही देशविरोधी कृत्यात गुंतली असून बांगलादेशातील बेकायदा घुसखोरांना आसाममध्ये वसवण्यास मदत करत आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
दिब्रूगड जिल्ह्यातील नामरूप येथे १०,६०१ कोटी रुपयांच्या खत कारखान्याचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. पंतप्रधानांनी सांगितले की, काँग्रेस देशविरोधी कृत्ये करत आहे. त्यांना बांगलादेशातील बेकायदा घुसखोरांना आसामच्या जंगलात आणि जमिनीवर वसवायचे आहे. त्यांचा उद्देश फक्त मतपेटी मजबूत करणे एवढाच आहे; त्यांना जनतेची पर्वा नाही. आसामी लोकांची ओळख, अस्तित्व आणि अभिमान यांची काळजी नाही, जी गोष्ट जपण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
काँग्रेसने येथील जुन्या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीही काहीच केले नाही, असे ते म्हणाले.
मतदार यादींच्या पुनर्विलोकनाला काँग्रेसचा विरोध आहे. कारण त्यांना फक्त सत्ता मिळवायची आहे. जे काही चांगले मी करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ते विरोध करतात. भाजप सरकार नेहमीच आसामी लोकांची ओळख, जमीन, अभिमान आणि अस्तित्वाचे रक्षण करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.
काँग्रेसने देशाचे मोठे नुकसान केले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे काम गेल्या ११ वर्षांपासून मी करत आहे. अजूनही अनेक गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे.
भूपेन हजारिका यांना ‘भारत रत्न’ देण्यात आले, तेव्हा काँग्रेसने उघड विरोध केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले होते की, ‘मोदी हे नाचणाऱ्या-गाणाऱ्या माणसांना ‘भारतरत्न’ देतात. हे वक्तव्य भूपेन हजारिका आणि आसामच्या लोकांचा अपमान आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, भाजप सरकारचे उद्दिष्ट आसामला शतकांपूर्वीच्या ‘अहोम’ राजवंशासारखे सामर्थ्यवान बनवणे आहे. औद्योगिकीकरण आणि दळणवळणामुळे आसामची स्वप्ने पूर्ण होत आहेत. भाजपच्या दुहेरी-इंजन सरकारमुळे युवकांना नवी स्वप्ने पाहण्याची ताकद मिळत आहे.
शेतकरी कल्याणासाठी सतत खतपुरवठा अत्यावश्यक आहे. हा युरिया कारखाना ती गरज भागवेल. वार्षिक १२.७ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेल्या या प्लांटमुळे पुरवठा साखळी अधिक सक्षम होईल आणि लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
विकासाचे लाभ गरीबांपर्यंत पोहचले!
देश तेव्हाच प्रगती करेल जेव्हा शेतकरी समृद्ध होतील आणि म्हणूनच भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. ईशान्य भारताचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. विकासाचा लाभ देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या गरीबांपर्यंत पोहोचला आहे. आमच्या प्रयत्नांमुळे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत आणि देशात एक नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे, असे मोदी यांनी सांगितले.