काँग्रेसच्या राज्यात जनतेची लूटमार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

राजस्थानात काँग्रेसचे सरकार असताना जनतेची लूटमार सुरू होती. काँग्रेसच्या काळात राजस्थान हे पेपरफुटीचे केंद्र बनले होते. गुन्हेगारांना खुलेआम संरक्षण मिळत होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
काँग्रेसच्या राज्यात जनतेची लूटमार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Published on

बांसवाडा : राजस्थानात काँग्रेसचे सरकार असताना जनतेची लूटमार सुरू होती. काँग्रेसच्या काळात राजस्थान हे पेपरफुटीचे केंद्र बनले होते. गुन्हेगारांना खुलेआम संरक्षण मिळत होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानच्या बांसवाडा येथे केंद्र व राज्य सरकारच्या १,२२,१०० कोटी रुपयांच्या विकास योजनांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी बांसवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसच्या काळात १०० रुपयांच्या वस्तू जनतेला १३१ रुपयांना मिळत होत्या, तर आता त्याच वस्तू १०५ रुपयांना मिळत आहेत. ५०० रुपयांचे बूट पूर्वी ५७५ रुपयांना मिळत होते. आता त्याच्यासाठी ५२५ रुपये मोजावे लागत आहेत. ६० हजारांच्या दुचाकीवर यापूर्वी १९ हजार कर द्यावा लागत होता, आता हेच प्रमाण १० हजारांवर आले आहे. सिमेंटवर ४० रुपयांची बचत होत आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले की, आपल्या दुकानांवर ‘स्वदेशी’चा बोर्ड लावावा. आम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. जे विकू स्वदेशी, जे खरेदी करू तेही स्वदेशीच. स्वदेशी म्हणजे माझ्यासाठी ब्रँड कोणत्याही देशाचा असो तो भारतात बनला पाहिजे. देशातील तरुणांच्या घामातून बनला पाहिजे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे आमचे लक्ष्य आहे. भारत हा कोणत्याही देशावर अवलंबून राहायला नको, असे ते म्हणाले.

नवरात्रीत शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि आज ‘ऊर्जाशक्ती’शी संबंधित एक कार्यक्रम होत आहे. तो म्हणजे वीज निर्मिती. भारताच्या वीज निर्मिती क्षमतेचा नवा अध्याय लिहिला जात आहे. आज ९० हजार कोटी रुपयांचे वीज प्रकल्प सुरू झाले आहेत. प्रत्येक राज्याला महत्त्व दिले जात आहे, असे मोदी म्हणाले.

तसेच पंतप्रधानांनी बिकानेर-दिल्ली कॅन्ट वंदे भारत एक्स्प्रेस, जोधपूर-दिल्ली कॅन्ट वंदे भारत एक्स्प्रेस आणि उदयपूर सिटी-चंदीगढ एक्स्प्रेस या तीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी ‘पीएम-कुसुम’ योजनेच्या राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथील लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेडच्या माही-बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाचे (४x७०० मेगावॉट) सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचे भूमिपूजन केले. हा प्रकल्प भारताच्या वीज क्षेत्राचे रूपांतर करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार परवडणारी, विश्वासार्ह व शाश्वत ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करेल. हा देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक ठरेल, जो सातत्यपूर्ण वीज पुरवठा करेल आणि पर्यावरण संरक्षण तसेच अणुऊर्जा क्षेत्रात भारताची भूमिका बळकट करेल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in