नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वरील नौदल कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी नौदलाच्या पराक्रमाचे कौतुक केले. या युद्धनौकेमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानची झोप उडाली होती, असे मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावरील ‘आयएनएस विक्रांत’ला भेट देऊन भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली. ‘आयएनएस विक्रांत’वर बसून, मोदी हे ‘मिग-२९के’ लढाऊ विमानांच्या बाजूने असलेल्या फ्लाइटडेकवर गेले आणि दिवसा व रात्री दोन्ही वेळी ‘मिग २९’ लढाऊ विमानांच्या लहान धावपट्टीवर उड्डाण आणि उतरण्याच्या हवाई शक्तीचे प्रात्यक्षिक पाहिले. भेटीदरम्यान, त्यांनी विमानवाहू जहाजावरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. त्यांनी जहाजावरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना मिठाई वाटली आणि संबोधित केले.
‘सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका
ही केवळ एक युद्धनौका नसून, २१ व्या शतकातील भारताची मेहनत, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धता यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. "आयएनएस विक्रांत हे असे नाव आहे, जे लढाई सुरू होण्यापूर्वीच शत्रूचे धैर्य खचवते," असे ते म्हणाले. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नौदलाला अरबी समुद्रात 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले होते. यावेळी आयएनएस विक्रांत आपल्या सोबत ८ ते १० युद्धनौका घेऊन मध्यभागी तैनात होती. भारतीय नौदलाच्या शांतताकाळातील नेहमीच्या सरावांव्यतिरिक्त, ही एक अत्यंत मोठी आणि वास्तविक वेळेतील निर्णायक हालचाल होती. या तैनातीमुळे पाकिस्तानला संभाव्य नौदल हल्ल्याच्या भीतीने धोक्याचे इशारे जारी करावे लागले होते.
मोदी झाले भावूक
युद्धनौकेवर घालवलेल्या रात्रीचा अनुभव सांगताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. ते म्हणाले, मी 'वर्तमान क्षणात जगणे' किती महत्त्वाचे आहे, हे तुमच्याकडून शिकलो. तुमचे समर्पण इतके मोठे आहे की मी ते पूर्णपणे जगू शकलो नाही, पण अनुभवले नक्कीच आहे. रोजच्या जीवनातील तुमचे हे आव्हान किती मोठे आहे, याची मला कल्पना आहे." रात्रीचा महासागर आणि पहाटेचा सूर्योदय पाहून त्यांची दिवाळी अधिक खास झाल्याचेही मोदी यांनी सांगितले.