
अक्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना'ने सन्मानित करण्यात आले आहे. घानाच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये चार वेगवेगळ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत आणि घाना मिळून मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात एकत्र काम करतील, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
सर्वोच्च सन्मानाबद्दल मोदी म्हणाले, घानाकडून सन्मानित होणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भारत आणि घाना दहशतवादाला मानवतेचा शत्रू मानतात आणि त्याविरोधात एकत्रितपणे लढा देतील. ही युद्धाची वेळ नसून, चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्या सोडवल्या पाहिजेत. तत्पूर्वी, त्यांनी घानाचे अध्यक्ष जॉन महामा यांच्यासोबत संयुक्त निवेदन जारी केले. त्याचबरोबर, पश्चिम आशिया आणि युरोपमधील सुरू असलेल्या संघर्षांवर दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली.
२५ हजार कोटींचा करार
भारत आणि घाना यांच्यातील व्यापार २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असून, पुढील ५ वर्षांत तो दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे मोदी यांनी नमूद केले. मोदींनी घानाचे अध्यक्ष जॉन महामा यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले.
भारतासाठी लोकशाही हा संस्कार - मोदी
भारत आणि घानाचे संबंध मजबूत असून दोन्ही देश सर्वसमावेशक विकास करत आहेत. भारतासाठी लोकशाही केवळ यंत्रणा नाही तर संस्कार आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारतात मोठे बदल झाले आहेत. मला सर्वोच्च सन्मान दिल्याबद्दल मी सर्व घानावासीयांचे भारतीयांच्या वतीने आभार मानतो. जग सध्या दहशतवाद, वातावरण बदल आदी समस्यांचा सामना करत आहे. त्यामुळे भारताची लोकशाही ही जगासाठी आधार बनली आहे.
४ सामंजस्य करार
भारत घानाला फिनटेक क्षेत्रात सहकार्य करेल आणि यूपीआयद्वारे डिजिटल व्यवहारांचा अनुभव सामायिक करेल. भारत घानाच्या तरुणांसाठी ‘आयटीईसी’ आणि ‘आयसीसीआर’ शिष्यवृत्तींची संख्या दुप्पट करणार आहे. भारत घानाच्या लष्करी प्रशिक्षणात, सागरी सुरक्षेत, संरक्षण साहित्य पुरवठ्यात आणि सायबर सुरक्षेत सहकार्य करेल. लस निर्मिती, संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांत मदत करण्याबरोबरच सायबर सुरक्षेतील परस्पर सहकार्य वाढवणे, घानाच्या तरुणांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी एक कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे यासह भारत 'जन औषधी केंद्रां'च्या माध्यमातून घानाच्या लोकांना स्वस्त आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरवेल, अशी ग्वाहीही मोदी यांनी यावेळी दिली.