

नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारमध्ये फेरबदलाची जोरदार चर्चा असून येत्या एक-दोन दिवसांत फेरबदल होऊ शकतात असेही बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर संभाव्य फेरबदलांच्या चर्चेला वेग आला आहे. या फेरबदलामध्ये महाराष्ट्रातून डॉ. श्रीकान्त शिंदे यांचे नाव आघाडीवर असून इतर घटक पक्षांमधील नेत्यांचाही समावेशहोऊ शकतो.
शिवसेनेचे (उबाठा) सहा खासदार शिवसेनेत आणून एनडीची ताकद वाढविण्यात मोलाचा वाटा उचलणारे डॉ. श्रीकान्त शिंदे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे तृमणूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांपैकी एक किंवा दोघांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
काही विद्यमान मंत्र्यांना (उदा. धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी) मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या जाऊ शकतात, अशाही बातम्या आहेत. मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा जोर धरत असली तरी, केंद्र सरकार किंवा भाजपच्या वतीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. फेरबदलाच्या यादीतील काही नावांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फेरबदलामध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकान्त दास यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याकडे अर्थखात्याची धुरा सोपविण्यात येणार असून विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण विभागाची सूत्रे सोपविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.