मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण; सत्तेवर भक्कम पकड कायम

२०१४, २०१९ नंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. मोदी यांनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सोमवारी अर्थात आज मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण होत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रफोटो सौ : एक्स
Published on

नवी दिल्ली : २०१४, २०१९ नंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. मोदी यांनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सोमवारी अर्थात आज मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण होत आहेत.

२०२४ च्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. या निवडणूक प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत भाजपचे सरकार जाईल, असे वाटत होते. पण, भाजपने नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांचे समर्थन घेऊन सरकार स्थापन केले.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती आणि एकूण ११ वा कार्यकाळ साजरा करताना, पंतप्रधान मोदी सत्तेवर ठाम आणि आत्मविश्वासाने कार्य करत आहेत. तेलगू देसम व जदयू या प्रादेशिक पक्षांनी मोदी सरकारला भक्कम पाठिंबा दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आपल्या राजकीय आणि शासकीय धोरणांमध्ये फेरबदल करून विधानसभा निवडणुकांमध्ये आश्चर्यजनक विजय मिळवले. त्यामुळे काँग्रेस आणि इतर ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांमध्ये निर्माण झालेले चैतन्य लवकरच मावळले.

हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लोकसभा निवडणुकीत झालेली पिछाडी भरून काढली. कल्याणकारी उपाययोजना आणि सामाजिक धोरणांमुळे हे शक्य झाले. दिल्लीत भाजपने २६ वर्षानंतर सत्ता मिळवली. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत केले.

दिल्ली विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक मनोज कुमार म्हणाले की, विरोधक मोदींना थेट आव्हान देण्यात अपयशी ठरले आहेत आणि त्यांचे नेतृत्व जवळपास आव्हानविरहित आहे. राजकारणात नेहमी संधी आणि आव्हाने असतात, पण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत त्यांना पर्याय दिसत नाही," असे ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर' या लष्करी कारवाईने त्यांची देशहितासाठी काम करणारा नेता म्हणून प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.

जातीय जनगणनेविषयीच्या मुद्द्यांमुळे आणि प्रादेशिक घटकांमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सरकारने जातगणनेचा निर्णय घेतल्याने भाजपने जनतेला भावणारे मुद्दे हातात घेतल्याचे दिसत आहे, असे कुमार म्हणाले.

'सबका साथ, सबका विकास' या धोरणावर आधारित मोदींचे कल्याणकारी मॉडेल भाजपसाठी फायदेशीर ठरले आहे आणि भविष्यातही ठरेल. कारण मोदी हे जनतेत लोकप्रिय आणि विश्वासार्ह नेते आहेत, असेही कुमार म्हणाले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखी जनमान्यतेची प्रतिमा मोदींची झाली आहे. वक्फ (सुधारणा) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांतून मंजूर करताना तेलगू देसम‌्, जदयू आणि चिराग पासवान यांच्या लोजप (रामविलास) कडून सरकारला पाठिंबा मिळाला, हे भाजपचे असलेले वर्चस्व दाखवते. ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयकावरही सरकारने काम सुरू ठेवले आहे.

तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात भाजपने राष्ट्रीय निवडणुकीत गमावलेली राजकीय जागा परत मिळवली आहे. आगामी वर्षात तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ – आणि रालोआ शासित आसाम व बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने, भाजप पुन्हा काही आश्चर्यकारक विजय मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचा सातत्याने पराभव

निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आहे. तृणमूल काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यासारखे इतर विरोधक काँग्रेसपासून दूर गेले आहेत. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे भवितव्य अनिश्चित दिसते.

logo
marathi.freepressjournal.in