कितीही दबाव येऊ दे, आमची ताकद वाढवणार! मोदींचा अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

सध्याच्या जगात सर्वजण आर्थिक स्वार्थाचे राजकारण करत आहे. प्रत्येकजण स्वत:पुरता पाहत आहे. आमच्यावर कितीही दबाव येऊ दे, आम्ही आमची ताकद वाढवणार आहोत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे लगावला.
कितीही दबाव येऊ दे, आमची ताकद वाढवणार! मोदींचा अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा
Published on

अहमदाबाद : सध्याच्या जगात सर्वजण आर्थिक स्वार्थाचे राजकारण करत आहे. प्रत्येकजण स्वत:पुरता पाहत आहे. आमच्यावर कितीही दबाव येऊ दे, आम्ही आमची ताकद वाढवणार आहोत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे लगावला.

अमेरिकेने २७ ऑगस्टपासून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी आता केवळ एक दिवस उरला आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. अहमदाबादच्या खोडलधाम मैदानात ५,४०० कोटी रुपयांच्या विकास योजनांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले की, शेतकरी, पशुपालक, लघुउद्योग यांचे हित अबाधित ठेवण्यात ते कुठलीही तडजोड करणार नाहीत. आमच्यावर दबाव वाढू शकतो, पण आम्ही तो सहन करू.

ते म्हणाले की, ६० ते ६५ वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने परदेशांवरील अवलंबित्व वाढवले, ज्यामुळे आयात घोटाळे करणे सोपे झाले.

भारताला बळ मिळाले आहे ते सुदर्शनचक्रधारी मोहन भगवान श्रीकृष्णाच्या मार्गावर चालण्यामुळे, ज्यांनी शक्ती व संरक्षणाचे प्रतीक दाखवले, तसेच चरखाधारी महात्मा गांधींच्या मार्गामुळे, ज्यांनी स्वदेशीचा आग्रह धरला, असे मोदी म्हणाले.

पहलगाम हत्याकांडानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना आणि पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी सांगितले की, आजचा भारत दहशतवादी व त्यांचे आका कुठेही लपले तरीही त्यांना सोडत नाही.

स्वदेशी वस्तूसाठी आवाहन

आपण सर्वांनी ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचा मंत्र अंगीकारला पाहिजे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाबाहेर मोठा फलक लावावा, ज्यावर लिहिले असेल की येथे फक्त ‘स्वदेशी’ वस्तू विकल्या जातात,” असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in