"मोदी जन्माने ओबीसी नाहीत, ते तर..." राहुल गांधींचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या भाषणात स्वतःला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते, यावरुन राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र डागले आहे.
"मोदी जन्माने ओबीसी नाहीत, ते तर..." राहुल गांधींचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या ओडीशा येथून मार्गक्रमण करीत आहे. या यात्रेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला थेट भिडताना दिसत आहेत. आता राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म ओबीसीमध्ये झाला नाही. ते गुजरातमधील तेली समाजात जन्माला आले. भाजपने 2000 साली या समाजाचा ओबीसीत समावेश केला, असा दावा राहुल गांधी यांनी गुरूवारी ओडिशात भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या भाषणात स्वतःला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते, यावरुन राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र डागले आहे.

"सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, नरेंद्र मोदीजी ओबीसीत जन्माला आले नाहीत. आपल्या सर्वांना मूर्ख बनवले जात आहे. नरेंद्र मोदीजी गुजरातमध्ये तेली समाजात जन्मले. त्यांच्या समाजाचा भाजपने 2000 साली ओबीसीत सामावेश केला. तुमचे पंतप्रधान ओबीसीत जन्मले नाहीत, ते जनरल कॅटेगरीत जन्माला आले. ते सर्व जगात खोटे बोलत आहेत की, मी ओबीसीत जन्माला आलो. हे मला कसं माहितीये ते सांगू... मला जन्म प्रमाणपत्राची गरज नाही...कारण ते (मोदी) कोणत्या ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते कोणत्या शेतकऱ्याचा हात पकडत नाहीत, ते मजुराचा हात पकडत नाहीत. ते फक्त अदानींचा हात पकडतात आणि ते पूर्ण आयुष्यात जातनिहाय गणना होऊ देणार नाहीत कारण ते ओबीसीत जन्माला आले नाहीत, ते जनरल कास्टमध्ये जन्माला आलेत, ते संपूर्ण जगाला खोटं सांगत आहेत. हे मी लिहून देतो की, जातनिहाय गणना फक्त आणि फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसच करु शकते, असेही त्यांनी म्हटले.

राहुल गांधींनी जातींचा अभ्यास करायला हवा-

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी आधी जातींचा अभ्यास करायला हवा, ते नेहमीच जातीयगणनेबाबत बोलतात, त्यांना माहिती आहे की तेली समाज कोणत्या गटातून येतो. तेली समाज ओबीसी प्रवर्गातच समाविष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच समाजाचे आहेत. राहुल गांधी यांना त्याबाबत काहीही माहिती ज्ञान नाही. देशाविषयी काही ज्ञान नाही. त्यांना देशातील जाती-पातीबाबत काहीही माहिती नाही. ते नेहमीच काहीही विचार न करता बोलतात, अशी टीका केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in