भारताचे रक्त खवळलेय! ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी उचललेली कायदेशीर पावले याबद्दल भाष्य केले.
भारताचे रक्त खवळलेय! ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा
एएनआय
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी उचललेली कायदेशीर पावले याबद्दल भाष्य केले. दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आपण न्याय देणार आहोत. सध्या भारतीयांचे रक्त खवळले आहे. या कटाचे षडयंत्र रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.

“आज तुमच्याशी संवाद साधताना, माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले. या दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयांचे रक्त खवळले आहे, याची मला कल्पना आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

“काश्मीरमध्ये शांतता परतत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य येत होते. बांधकामांना अभूतपूर्व गती मिळाली होती. लोकशाही मजबूत होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. लोकांचे उत्पन्न वाढत होते. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. पण हेच देशाच्या शत्रूंना आणि जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना आवडले नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे,” असेही ते म्हणाले.

“पहलगाम हल्ला हा दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांच्या निराशेचे प्रतीक आहे. आता कुठे काश्मीर पूर्वपदावर येत होते, परंतु दहशतवाद्यांना ते रुचले नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे भारताच्या परंपरा आणि मूल्यांना सामावून घेते. संकटात जगाचा मित्र म्हणून मानवतावादाप्रति बांधिलकीचे भारत हा प्रतीक आहे. मी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याची निंदा केली. त्यांनी मला फोनवर, पत्र पाठवत आणि संदेश देत या लढाईत भारतासोबत असल्याचे सांगितले,” असेही मोदी म्हणाले.

मोठा धडा शिकविणार!

“मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना खात्री देतो की, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांना आम्ही मोठा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देशात जो आक्रोश आहे, तोच आक्रोश जगभरात आहे. या हल्ल्यानंतर जगभरातील नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. संपूर्ण जग आज दहशतवादविरोधी लढाईत भारताबरोबर आहे,” असेही मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in